खबरकट्टा / चंद्रपूर : मनपा आमसभा वृत्तांत -
चंद्रपूर महानगरात झपाट्याने कोरोना रूग्ण वाढले. मृत्यूदरही वाढत आहे. प्रारंभी, मनपाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्याचा गाजावाजा केला. खाजगी जम्बो कोविड रूग्णालयाला एकाच दिवशी मान्यता देवून मनपा मोकळी झाली. मात्र, या निर्णयाला सर्वस्तरावर विरोध पत्करावा लागला.
बुधवार, 30 सप्टेंबर पार पडलेल्या आभासी आमसभेत सत्ताधार्यांसह विरोधी सदस्यांनी गोंधळ घातल्यानंतर मनपाचे स्वतंत्र्य कोविड रूग्णालय उभारू. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून शासनाला अहवाल पाठविला जाईल, असा निर्णय मनपाने घेतला आहे. हे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.
कोरोनाच्या महामारीत मनपा नगरसेवकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 25 लाख रूपये देण्यास विषय आमसभेत चर्चेला आला. त्यावर सदस्यांनी गदारोळ केला. नगरसेवकांच्या मृत्यूची मनपा प्रशासन व पदाधिकारी वाट बघत आहेत का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
नगरसेवकांना 25 लाख रूपये देण्याऐवजी त्यांच्या उपचार कसा मोफत होईल. तसेच महानगरातील जनतेच्या उपचारार्थ अत्यावश्यक उपाययोजनांवर आवश्यक तो निधी खर्च करा, अशी मागणी नगरसेवक अंजली घोटेकर, पप्पू देशमुख यांच्यासह अन्य सदस्यांनी रेटून धरली. त्यावर आयुक्तांनी स्वतंत्र्य कोविड रूग्णालय उभारण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा निर्णय ‘तलावातील पाणी निघून गेल्यावर पाळ बांधल्यासारखा’ असल्याचे मतही नगरसेवकांनी व्यक्त केले.
कोरोना केअर केंद्रात दाखल असलेल्या रूग्णांना महानगरपलिकेने चाय, नास्ता व भोजन पुरविले. सुरूवातीला या कामाचे कंत्राट स्थानिकांना दिले गेले. पण, मध्यंतरी स्थानिकांना कंत्राट मनपाने कारण नसताना बंद केले. लगेच नागपूर येथील एका व्यक्तीला भोजनाचे कंत्राट दिले. पण, त्यांनीही स्थानिकांनी पेटी कंत्राट दिले. भोजनाचे अवाजवी दर त्या कंत्राटदाराने आकारले असून, मनपाला जवळपास 60 ते 70 लाखांचा फटका बसल्याची ओरड नगरसेवकांनी केली. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी रेटून धरली.