वैनगंगेच्या महापुराचा फटका बसलेल्या गावांमधील स्थलांतरित शेकडो नागरिकांना आपल्या गावात आणून अन्नदान व निवाऱ्याची व्यवस्था केल्याने पूरग्रस्त भारावून गेले आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांच्या महापुराने ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावात पुराचे पाणी शिरले होते. रणमोचन येथील शेकडो पूरग्रस्त निलज येथे स्थलांतरित झाले होते.
सदर पूरग्रस्तांना निलज वासीयांनी आपापल्या वाहनांनी आपल्या गावात आश्रयासाठी आणली होती पूरग्रस्तांना गावातील शाळेत ठेवण्यात येऊन त्यांची निवासाची उत्तम व्यवस्था केली होती त्याचबरोबर गावातील लोकवर्गणीतून पूरग्रस्तांना तीन ते चार दिवस अन्नदान सुद्धा केले सदर मदतकार्यात सहभाग घेतला नाही असे एकही घर किंवा नागरिक राहिला नाही तसेच एकही पूरग्रस्त उपाशी पोटी झोपला नाही.
मदतकार्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग देखील उल्लेखनीय होता. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव व गटातटाचा विचार न करता एकदिलाने मदतकार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि जोमाने मदतकार्य राबविले.
पहिल्या टप्प्यात निलज वासीयांनी पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करून स्वतःच्या वाहनांनी आपल्या गावात आणले त्यांचे प्रापंचिक साहित्य व जनावरे बाहेर काढण्यासाठी मदत केली.
त्यानंतर निलज येथे आश्रयासाठी आलेल्यांना राहण्याची तसेच नास्ता, चहापाणी व जेवणाची चांगली सोय केली ही सर्व व्यवस्था केल्याबद्दल पूरग्रस्तांनी याबाबत समाधानाची भावना व्यक्त केली आहे महापुराच्या या संकटाच्या काळात घरच्याप्रमाणे निलजवासीयांनी सोय केल्याने त्यांची ही मदत आयुष्यात विसरणार नसल्याची भावना रणमोचन येथील पूरग्रस्तांनी व्यक्त केली.
🔰 निलज वासीयांकडुन पुरग्रस्त गावांना अन्नधान्याची मदत
पुरग्रस्त झालेल्या गावांमधील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य वाहून गेले. त्यामुळे त्यांची गरज लक्षात घेता निलज येथील गावकऱ्यांनी गावातून तांदूळ व दाळ जमा केली. व त्याचे वितरण पूरग्रस्त खरकाडा, किन्ही गावात करण्यात आले. यामुळे तेथील गावकऱ्यांनी निलजवासीयांचे आभार मानले आहे. खरंतर अशा संकटसमयी निलज येथील नागरिकांनी दाखविलेल्या माणुसकिबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.