शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. उपविभागीय दंडाधिकाºयांची या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आठ हजारांचा टप्पा गाठू लागली आहे. यातून चार हजारांवर रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी तीन हजारांवर रुग्ण उपचार घेत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा सेवा देण्यात कमी पडू लागली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरबाबत रुग्णांच्या नातलगांच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे अजय गुल्हाने यांनी याकडे स्वत: लक्ष देणे सुरू केले आहे.
त्यांनी सर्वप्रथम या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी रोहन घुगे यांची प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या १२१ डॉक्टर्स कार्यरत आहेत.
मात्र कोविड रुग्णालयात फार कमी डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जास्तीत जास्त डॉक्टर्स कोविड रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.- अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी, चंद्रपूर
🔰 रुग्णांच्या नातेवाइकांकरिता आता मदत कक्ष :
रुग्णाला किंवा त्याच्या नातलगांना काही समस्या जाणवत असेल वा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांना तत्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे.