कोरोना महामारीत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या-ना-त्या कारणाने चर्चेत येत आहे. महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तथा माजी महिला व बालकल्याण उपसभापतींचे पतीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार आहे. ते कोरोना बाधित असून, प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या बाधिताचा मृत्यू गुरूवारी दुपारी झाला. पण, नातेवाईकांना तब्बल पाच तास उशिराने म्हणजे, संध्याकाळी 7 वाजता याबाबतची माहिती देण्यात आल्याचा आरोप संबंधिताच्या नातेवाईकांनी केला आहे.
तत्पूर्वी, मृतकाच्या नातेवाईकांनी येथील डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. पण, त्यांनी काहीच सांगितले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या रूग्णालयात गंभीर रूग्णांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोपही मृतकाचे नातेवाईकांनी केला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून, मृत्यूदरातही दिवसागणिक वाढ होत आहे. पण, येथे अत्यावश्यक सुविधांची अद्याप वाणवा आहे. महाविद्यालय प्रशासन, जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचा दावा करीत आहेत.
पण, प्रत्यक्षात हा दावा फोल ठरत असल्याचा आरोपही बाधित रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या बाधिताची कोरोना तपासणी करण्यात आली असता, त्यांचा अहवाल सकारात्मक आला.
त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. पण, तिथे खाटांची कमतरता होती. त्यामुळे अखेर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे काही नगरसेवकांच्या प्रयत्नांनी त्यांना खाट मिळाली. पण, रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अपेक्षित उपचार केला नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे. ही स्थिती या एकट्या बाधिताची नसून, अन्य बाधित रूग्णांचाही असाच आरोप आहे.
आरोप मृताचे नातेवाईक बापू अंसारी यांनी केला आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद मोरे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले संबंधित बाधित हा जेव्हा आमच्याकडे भरती झाला, तेव्हाच तो गंभीर होता. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. उपचार झाला नाही किंवा हलगर्जीपणा झाला, असे म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.