तक्रारदार व्यक्तीला पोलिस ठाण्यात अमानुष मारहाण #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तक्रारदार व्यक्तीला पोलिस ठाण्यात अमानुष मारहाण #bramhpuri

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपुरी, दि. १८ : 


शुल्लक कारणावरून घराशेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, यातील एकाच्या घरी जाऊन पोलिसांनी झडती घेतली. फोन करून घरमालकाला बोलावून घेतले. 


पोलिस ठाण्यात नेऊन ठाणेदार यांच्या दालनात चौघांनी पकडून ठेवत बाजीराव ( कापडी पट्टा ) ने बेदम मारहाण केल्याची घटना ब्रम्हपुरी येथे घडली. देवानंद गोन्नाडे (४०) रा.गांधीनगर असे पिडीत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणाची तक्रार देवानंद याने उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे केली आहे. 


तक्रारदार देवानंद गोंनाडे रा. गांधीनगर यांचे गाडी ठेवण्याच्या कारणावरून दि. १३ ला घराशेजारी राहणाऱ्या अनिल उंदिरवाडे याच्याशी भांडण झाले. त्याच दिवशी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तर विरोधी यांनी सुद्धा तक्रार दाखल केली. चार ते पाच पोलिसांनी दुसऱ्या दिवशी दि. १४ ला कोणतीही शहानिशा न करता देवानंद गोन्नाडे यांच्या घरी झडती घेतली. 


यावेळी कोणतीही महिला पोलीस कर्मचारी त्यांच्या सोबत नव्हती. यावेळी देवानंद याची पत्नी व लहान मुलेच घरी होते. पोलिसांनी फोन करून देवानंद यास बोलविले व पोलिस वाहनात बसवून पोलिस ठाण्यात नेले. ठाणेदार यांच्या दालनात चार पोलिसांनी बळजबरीने पकडून ठेवले, व शिवणकर नामक शिपायाने बाजीराव ( पट्टा ) ने बेदम मारहाण केली. 


यावेळी कारण विचारले असता चूप बसण्याची धमकी देत आणखी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत देवानंद दोन्ही हातांवर, मनगटावर, दोन्ही तळपायावर व मांडीवर जबर दुखापत झाली. असे देवानंद याने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत म्हंटले आहे. तक्रारीच्या प्रतीलिपी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवीण्यात आली असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

एखाद्या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता कोणतेही कारण नसताना पोलिसांनी ठाण्यात व दस्तुरखुद्द ठाणेदार यांच्या दालनात पकडून ठेवत बेदम मारहाण केली. कोणत्या कायद्यानुसार पोलिसांना जनसामान्यांना अशा प्रकारे बेदम मारहाण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 


असा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस विभागवार आहे. त्या पोलिसांकडून असा प्रकार होत असेल तर जनसामान्यांनी दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न विचारला जात आहे. सदर प्रकारावरून जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सदर प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात. की कुठलीही कारवाई न करता खुली सूट देण्यात येणार हे कारवाईनंतर स्पष्ट होणार आहे.