चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ केली असुन आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना आता प्रतिमाह ४०००/- रुपये मानधन दिले जाणार आहे. मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात कोविड -१९ साथीच्या रोगाच्या काळात आशांचे काम महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. या आशासेविका, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या कॉण्टॅक्ट ट्रेसिंग सर्वेक्षणात मोठ योगदान देत आहेत व न घाबरता आशा शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहेत.
याशिवाय शासनाच्या अनेक महत्वपुर्ण आरोग्य अभियानामधे अनेक कामे या आशा स्वयंसेविका न थकता अविरतपणे करतात. यासाठी त्यांच करावं तेवढं कौतुक थोडंच असल्याचे महापौर याप्रसंगी म्हणाल्या.
शहरी प्राथमीक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांचे मानधन / कामावर आधारीत मोबदला अत्यल्प आहे. हा मोबदला वाढविण्यात यावा अशी मागणी या स्वयंसेविकांनी केली होती.
त्याअनुषंगाने मा. महापौर यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेनुसार ऑगस्ट महिन्यापासुन ते डिसेंबर २०२० अथवा कोव्हीड -१९ चे कामकाज चालु असेपर्यंत ( यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ) कर्तव्य पार पडणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना एकत्रित मानधन प्रतिमाह रुपये ४०००/- देण्याचे निश्चित करण्यात आले. मागणी मान्य केल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी महापौर यांचे आभार मानले.