चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे.
सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.
बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
मागील सहा दिवसांचा विचार केला तर या सहा दिवसात तब्बल 1297 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 31 ऑगस्टला 203 रुग्ण आढळून आले. 1 सप्टेंबरला 216, 2 सप्टेंबरला 182, 3 सप्टेंबरला 222 तर 4 सप्टेंबरला तर तब्बल 279 तर 5 सप्टेंबर ला 195 रुग्ण आढळून आले. ही संख्या सर्वाधिक आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्यातरी माक्स लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच एकमेव उपाय आहे. राज्य शासन व आरोग्य विभाग सातत्याने हेच नागरिकांना सांगत आहे. नागरिकांचा रोजगार सुरू रहावा, देशाची आर्थिक स्थिती बरी रहावी, यासाठी अनलॉक सुरू करण्यात आले आहे.
मात्र हे करताना काही बंधने घालून नागरिकांना बाहेर निघण्याची मुभा देण्यात आली. मात्र अनेकजण अनलॉकचा अर्थ म्हणजे पूर्वीसारखेच वाट्टेल तसे वागणे, असा समजत आहे की काय, असे चित्र शहरात दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लान्ट उभे करण्याची कारवाई तत्काळ करावी. तसेच १०० खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे.