खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता आता स्थानिक प्रशासनाने चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात जनता कर्फ्यू गुरुवारी 10 सप्टेंबर ते रविवार 13 सप्टेंबर या चार दिवसांसाठी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या विषयावर आज 7 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन, राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनांच्या उच्च अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय संकुलाच्या नियोजन इमारतीत झाली.
बैठकीत कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी एकमताने चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरांमध्ये चार दिवसांचे कठोर सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्हयात जनता कर्फ्यू लावताना काही महत्वपूर्ण विषयांच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे जिल्हाधिकारी श्री. अजय गुल्हाने यांच्याकडे करण्यात आली. यातील बहुतांश विषयांच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनता कर्फ्यू च्या अनुषंगाने संपन्न झालेल्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मागणीचे एक निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.
भाजपाने केलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हयातील डॉक्टर्स, परिचारीका, आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरावी, रूग्णवाहीकांची कमतरता त्वरीत दूर करावी, ऑक्सीजन सिलेंडर्स, व्हेटीलेटर्स, रूग्णांसाठी बेड्स त्वरीत उपलब्ध करावे, आयसीयू मध्ये रूग्णांना जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, हातावर पोट घेवून जगणा-या गरीबांना रेशन धान्य, पॅकेज देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
तसेच गरीबांच्या भोजनाची योग्य व्यवस्था करावी, जंतूनाशक फवारणी व सफाई मोहीमेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करावा, गरीबांपर्यंत किराणा व धान्याच्या किट्स पोहवाव्या, बॉर्डर सील कराव्या तसेच अवैध दारूविक्रीवर प्रतिबंध घालावा, मास्क अनीवार्य करावे, सार्वजनिक जागा सॅनिटाईज कराव्या, पीपीई किट्स उपलब्ध कराव्या,.
संजय गांधी निराधार योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या अन्य योजनांचे अनुदान त्वरीत द्यावे, खाजगी रूग्णालयांमध्ये तसेच इतर कोणत्याही ठिकाणी कोरोना चाचणीसाठी शुल्क आकारू नये, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आकाशवाणी, समाज माध्यमांवर व्हिडीओंचे प्रसारण, प्रसिध्दी फलक आदींचा वापर करावा या मागण्या भाजपातर्फे करण्यात आल्या आहेत.