कोरोनाचे सावट आणि पावसाळ्यामुळे बंद असलेले ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्र येत्या ऑक्टोबर महिन्यात पर्यटनासाठी खुले केला जाणार असल्याची माहिती डीएफओ गुरुप्रसाद यांनी दिली. या निर्णयाने वन्यजीव प्रेमींमध्ये व स्थानिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र मार्च महिन्यापासून बंद आहे. सलग तीन महिने ताडोबाचे बफर आणि कोअर या दोन्ही क्षेत्रांना कुलूप होते. केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदीत शिथिलता दिली. त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाच्या उत्पन्नात भर पडावी, स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा आणि पर्यटक, निसर्गप्रेमींनाही जंगल सफारीचा आनंद लुटता यावा यासाठी राज्य शासनाने टाळेबंदीच्या अटी व शर्तीचे पालन करून 1 जुलैपासून बफर क्षेत्रात पर्यटनासाठी परवानगी दिली होती.
मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने कोअर क्षेत्र बंद ठेवण्यात आले होते. आता येत्या १ ऑक्टोबर महिन्यापासून कोअर क्षेत्र पर्यटकांसाठी खुले होणार आहे. एका जिप्सीत ४ पर्यटकांना परवानगी दिली जाईल. १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरु होईल. mytadoba.org या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली जातील.
मोहुर्ली, खुटवंडा, नवेगाव, कोलारा, पांगडी व झरी या सहा प्रवेशद्वारावरून पर्यटनवारी सुरू होणार आहे. कोअर क्षेत्रात 125 जिप्सी जाण्याची क्षमता आहे. पण, 96 जिप्सी सोडल्या जातील, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. भागवत यांनी दिली.
कोरोनाचे सावट अद्याप कायम असल्याने शासन निर्देशान्वये जंगल भ्रमंतीला प्रारंभ करण्यापूर्वी जिप्सीचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. जिप्सी चालक, मार्गदर्शकांजवळ विषाणूनाशक असणे बंधनकारक असेल. पर्यटकांजवळ मुखाच्छादन व विषाणूनाशक असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे ते म्हणाले. ताडोबा भ्रमंतीत कुठलीही दरवाढ केली गेली नसून, मागील वर्षीचे दर कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले.