चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जगभरात ख्याती आहे. परंतु, येथे पर्यटकांनी केवळ वाघ बघायला येऊ नये, तर निसर्गसृष्टीही अनुभवावी, या उद्देशाने राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे आगरझरी येथे 11 फेब्रुवारी 2018 रोजी फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते.
परंतु, कोरोना काळातील टाळेबंदीमुळे हे उद्यान 25 मार्चपासून बंद होते. आता मात्र 1 ऑक्टोबरपासून हे फुलपाखरू उद्यान पूर्ववत सुरू होणार आहे. नवीन डायोरामा उपक्रमासह नौकाविहार, सायकलिंगचीही सोय आता पर्यटकांना मिळणार आहे.
या उद्यानात पर्यटकांना फुलपाखरांबद्दलची अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची माहिती अद्ययावत चित्रांद्वारे दिली जाते, त्यासाठी एक विशेष दालन तयार करण्यात आले आहे. या सोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी, सेल्फी पॉईंट, झुलता पुल हे या उद्यानाचे आकर्षण आहे. प्रत्येक फुलपाखराला राहायला, अंडी द्यायला आणि खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झाड आणि फुलाची आवश्यकता असते.
त्यासाठी येथे खास प्रकारची झाडे लावण्यात आली आहे. येथे फुलपाखराच्या अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू या चारही अवस्था पाहायला मिळतात.
आता हे फुलपाखरू उद्यान पर्यटकांसाठी 1 ऑक्टोबरपासून सुरु होत असून, त्यासोबतच नौकाविहार, सायकलिंग व सीताराम पेठ येथे 6 किलोमीटर नैसर्गिक सहल हे नवीन उपक्रमसुध्दा येथे सुरू होणार आहे.