मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार कामावर न जाणार्‍या व्यक्तीच्या नावे काढली मजूरी #mgnrega - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार कामावर न जाणार्‍या व्यक्तीच्या नावे काढली मजूरी #mgnrega

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी , दि.11 : 

पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत येणाऱ्या रुई ग्रामपंचायत येथील मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे केली. मात्र, महिना लोटूनही तक्रारीची चौकशी करण्यात आली आली नसल्याने पाणी कुठे मुरत आहे काय ? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.       


ग्रामपंचायत रुई येथे   सन २०१९- २० या कालावधीत मनरेगाची कामे करण्यात आली. यामध्ये वृक्ष लागवड, वृक्षांना पाणी टाकणे, खोलीकरण अशी कामे राबविण्यात आली होती. यामध्ये मनरेगाच्या कोणत्याच कामावर न जाणाऱ्या व्यक्तींच्या नावे आजपर्यंत मजूरी काढण्यात आली. तसेच काही मजुरांच्या नावाने दुप्पट मजूरी काढण्यात आली. 


ही माहिती मनरेगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार  झाल्याची तक्रार करीत या प्रकाराची  चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी  येथील गावकऱ्यांनी ८ जुलै २०२० ला संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्याकडे केली. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटूनही अद्याप तक्रारीची चौकशी झाली नसल्याने वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचाराला पाठबळ देत आहेत की काय ? असा प्रश्न  तक्रारकर्ते करू लागले आहेत.


कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने कदाचित हा विषय आपल्या नजरेतून सुटला असावा.  आपण उद्या कार्यालयात पोचल्यावर प्रकरण नेमके काय आहे. त्यानुसार उचित कारवाई करू - प्रणाली खोचरे,  प्रभारी संवर्ग विकास अधिकारी, ब्रम्हपुरी


भ्रष्टाचार व अवैध धंद्यांची तक्रार होऊनही कारवाई का होत नाही?     


ब्रम्हपुरी तालुक्यातील अगदी ग्रामीण भागापासून तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उत आलेला आहे. शासनाच्या मालकीचे  गौण खनिज, अवैध दारू विक्री, बांधकामात भ्रष्टाचार, शासकीय कामात अनियमितता, मजुरांची पिळवणूक, अनियमित प्लॉट निर्मिती अशा अनेक प्रकरणांची अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करण्यात येते. मात्र, जनतेच्या सेवेकरिता असलेले प्रशासन जनसामान्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बरेचदा समोर आले आहे. एवढेच नव्हे तर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येते. मात्र, सर्वत्र काळाबाजार सुरू असताना प्रशासन ठोस कारवाई का करीत नाही. किंवा प्रशासनाकडून कारवाई का होत नाही. असा प्रश्न समस्त तालुक्यातील जनतेसमोर निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुक्यात सुरू असलेल्या नियमबाह्य, अवैध कामांवर व भ्रष्टाचारावर अंकुश घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.