आगळे-वेगळे : खुद्द चोरांनीच चोरीचे प्रात्यक्षिक दिल्यावर आपल्या घरात चोरी झाल्याचे घरमालकाला कळले : कुटुंब अवाक : स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी #LCB CHAMDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आगळे-वेगळे : खुद्द चोरांनीच चोरीचे प्रात्यक्षिक दिल्यावर आपल्या घरात चोरी झाल्याचे घरमालकाला कळले : कुटुंब अवाक : स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी #LCB CHAMDRAPUR

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


पोलिस अचानक घरी दाखल झाले. सर्व कुटुंबीय चक्रावले. चोरीच्या घटनेबाबत विचारणा सुरू झाली. चोरीबाबत कल्पना नसल्याने कुटुंबीयांनी साफ नकार दिला. परंतु, पोलिस चोरीच्या घटनेवर ठाम होते. हो-ना चा खेळ काही वेळ सुरू होता. अखेर, पोलिसांनी खुद्द चोरट्यांना कुटुंबीयांसमोर उभे केले. 


चोरट्यांनी घरातून चोरी केलेला ऐवज, ठिकाण आणि चोरी केलेली कृती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी चोरट्यांनी सांगितलेले ठिकाण बघताच सोन्याच्या दागिन्यांची बॅग आढळून आली नाही. अखेर, कुटुंबीयांनी चोरीची घटना घडल्याचे मान्य करीत तोंडी तक्रार दाखल केली.

शहरातील गांधी चौक परिसरात करण उर्फ ताला मुन्ना समुद (वय 24, रा.पंचशील चौक, घुटकाळा वॉर्ड), अतुल विकास राणा (वय 22, रा. श्‍यामनगर, बंगाली कॅम्प चंद्रपूर), सुमोहित चंद्रशेखर मेश्राम (वय 22, रा. अष्टभुजा वॉर्ड) हे तीन आरोपी संशयास्पदस्थितीत फिरत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे 38.72 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.

पोलिसांनी या तिन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली. तपासात चोरट्यांनी तुकुम परिसरातील छत्रपतीनगरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस कर्मचारी हे मंगेश दशरथ जमदाळे (वय 29) यांच्या घरी दाखल झाले. अचानक पोलिस घरी दाखल झाल्याचे बघून जमदाळे कुटुंबीयांना धक्का बसला. पोलिसांनी चोरीच्या घटनेबाबत विचारणा केली. तेव्हा घरात चोरी न झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अटकेतील चोरट्यांना झालेला घटनाक्रम कथन करण्यास सांगितले.

चोरांनी दाखवले प्रात्यक्षिक

चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीतून आत लाकडी काडी टाकून त्याद्वारे आलमारीला लटकविलेली बॅग बाहेर काढून पळ काढल्याचे सांगितले. यानंतर जमदाळे कुटुंबीयांनी बेडरूममधील बॅग बघितली. परंतु, बॅग आढळून आली नाही. अखेर, पोलिसांनी सांगितलेल्या चोरीच्या घटनेनंतर कुटुंबीयांचा विश्‍वास बसला.

बॅग आलमारीच्या हॅण्डलला

मध्यप्रदेशातील खाणीतून चार महिन्यांपूर्वी चंद्रपुरातील महाकाली कॉलरी येथे बदली झाल्यानंतर जमदाळे कुटुंबीयांसह छत्रपतीनगरातील राजेंद्र गोरे यांच्या घरी किरायाने आहेत. 21 ऑगस्टला गौरीपुजनाला घरातील महिलांनी सोन्याचे दागिने अंगावर घातले होते. त्यानंतर सायंकाळी सव्वादोन तोळ्याची पोत, सोन्याची अंगठी, सोन्याचा गोफ असा सुमारे एक लाख 94 हजार रुपये किमतीचे सर्व दागिने आणि दीड हजार रुपये रोख असलेली बॅग बेडरूममधील आलमारीच्या हॅण्डलला अडकवून ठेवली होती, असे जमदाळे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले. 


ही कारवाई पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, पद्माकर भोयर, सुरेश केमेकर, अमजद खान, अनुप डांगे, सतीन बगमारे, मिलिंद जांभुळे, दिनेश अराडे यांच्या पथकाने केली.


दुसऱ्या गुन्ह्यातील तीन चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान छत्रपतीनगरातील चोरीच्या घटनेची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिस पथक घरी दाखल झाले. तोपर्यंत संबंधित कुटुंबीय चोरीच्या घटनेबाबत अनभिज्ञ होते. अखेर, चोरट्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानंतर चोरीची घटना घडल्याचे कुटुंबीयांनी मान्य करीत तक्रार दाखल केली.


-ओमप्रकाश कोकाटे,पोलिस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर