खबरकट्टा / चंद्रपूर :
सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाचा नाकर्तेपणा व दुर्लक्ष ह्यामुळे वर्षानुवर्ष शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.
हिच परिस्थिती काल राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील धर्मा करमनकर ह्या 60 वर्षीय अल्पभूधारक शेतकर्यावर आल्याने शेवटी ह्या अन्नदात्याने शेतातच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
सविस्तर वृत्त असे की, विहीरगाव येथील धर्मा करमनकर ह्या 60 वर्षीय शेतकरी जवळपास 4 एकर शेतीचा मालक होता. त्याचेवर बँक ऑफ इंडियाचे सुमारे 2 लाखाचे कर्ज होते. शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर केली आणि ह्या शेतकऱ्याच्या जगण्याच्या अशा पल्लवित झाल्या परंतु शासनाने सरसकट कर्जमाफीच्या नावाने अनेक अटी शर्ती लादल्या.
सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने कृषी केंद्र चालक उधारीवर बियाणे, खते व कीटकनाशके देण्यास तयार नाहीत, शेतकर्यांकडे रोकड नाही आणि बँक कर्ज देत नाही अशा सर्व बाजुने वेढ्यातून सुटका होणे शक्य नसल्याने काल शेवटी धर्मा करमनकर ह्याने शेतातच विष घेतले.
शेतातच सोबत काम करत असलेल्या पत्नीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली असता इतर शेतकर्यांनी धर्मा करमनकर ह्यांना तातडीने राजुरा येथिल शासकीय रुग्णालयात व तिथुन चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान शेवटी धर्मा करमनकर ह्यांचा संघर्ष एकदाचा थांबला असुन उत्तरीय तपासणी नंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.धर्मा करमनकर ह्यांचे पश्चात पत्नी व एक विवाहित मुलगा असा परिवार आहे.