लॉकडाऊन च्या काळातील आलेल्या बिलामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला होता. आता मात्र यावर दिलासा देणारे वृत्त हाती येत आहे. लवकरच राज्यातील ग्राहकांना बिलांमध्ये मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये शंभर ते चारशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना या काळातील बिलातून सवलत देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दिली.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिले पाठविण्यात येत होती. लॉकडाउन उठविण्यात आल्यानंतर जूनमध्ये रिडिंग घेण्याचे काम सुरू झाले आणि नव्या रिडिंगनुसार एकत्रित बिले पाठविण्यात आली.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिले पाठविण्यात येत होती. लॉकडाउन उठविण्यात आल्यानंतर जूनमध्ये रिडिंग घेण्याचे काम सुरू झाले आणि नव्या रिडिंगनुसार एकत्रित बिले पाठविण्यात आली.
मात्र, त्यातील भरमसाट रकमा पाहून हजारो ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. विविध पक्ष संघटनांनी याविरोधात आंदोलनेही केली आहेत. या विषयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीतही जोरदार चर्चा झाली होती. या बिलांबाबत जनतेत निर्माण झालेला रोष पाहता राज्य सरकार ग्राहकांना वीज बिलांबाबत मोठी सवलत देऊ करणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यानुसार दरमहा शंभर ते चारशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांना या काळातील बिलांमधून मोठी सूट देण्यात यावी अशा आशयाच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे. ही सवलत दिली, तर त्याचा भार राज्य सरकारवर येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला किती पैसे मोजावे लागतील, याचा अभ्यास ऊर्जा विभाग आणि अर्थ विभागाकडून सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
आर्थिक बाबींचा विचार करून लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी मिसाळ आणि टिंगरे यांनी केली.यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्राहकांना सवलत देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगितले.