मुख्य अभियंता राजू घुगे यांची बदली, पंकज सपाटे नवे मुख्य अभियंता !#cstps - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुख्य अभियंता राजू घुगे यांची बदली, पंकज सपाटे नवे मुख्य अभियंता !#cstps

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

मुंबई महानिर्मितीद्वारे निर्गमित झालेल्या स्थानांतरण आदेशाद्वारे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांची भुसावळ येथे तर भुसावळचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची चंद्रपूर वीज केंद्रात बदली करण्यात आली आहे. 

चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचा दांडगा अनुभव होता. त्यांनी १ जून २०१९ ला चंद्रपूरचे मुख्य अभियंता म्हणून सूत्रे हाती घेतली. या दरम्यान त्यांनी विजेची अधिकाधिक निर्मिती होईल, याकडे विशेष लक्ष दिले. 

मनमिळाऊ व शांततापूर्वक औद्योगिक समस्येचे निराकरण करण्याची त्यांची शैली होती, मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर येणारे भुसावळ वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे चंद्रपूरचे मूळ निवासी आहेत.

चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन चे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या बदलीने वातावरण तापले असून घुगे यांच्या रूपाने पुन्हा एक राजकीय बळी गेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ही राजकीय खेळी सुरू असून नुकतेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांच्या झालेल्या बदलीनंतर जिल्ह्यातील सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांच्या कट कारस्थानावर सामान्य जनता आपला रोष प्रकट करून राहिली आहे. 

मागील दहा दिवसापासून चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये प्रकल्पग्रस्तांचे चिमणी वरून आंदोलन सुरू होते. अनेक वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात शासन अपयशी ठरली. होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी चिमणी वर चढून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला तीव्र स्वरूप प्राप्त झाल्यानंतर शासन हादरले, अखेर प्रकल्पग्रस्तांनी 10 दिवसांनंतर हे आंदोलन मागे घेतले. 

याचाच वचपा काढण्यासाठी मुख्य अभियंता राजू घुगे यांची आकस्मिक बदली करण्याचे राजकीय षडयंत्र खेळण्यात आले. राजू घुगे यांच्या कार्यकाळात फक्त एक वर्षाच्या अवधी झाला होता. त्यांचे उत्कृष्ट कार्य व नम्र स्वभाव हा अनेकांची मने जिंकून गेला होता. अशातच त्यांची झालेली बदली राजकारणाच्या भाग असल्याचे सांगण्यात येत असून जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे.