खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपुरच्या सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांच्याविरुद्ध नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केलेली आहे.गत 6 महिने पगारापासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना डॉ. सोनारकर दहशतीखाली ठेवतात,त्यांना सतत कामावरून काढण्याची धमकी देतात व काहीही कारण नसताना बेकायदेशीरपणे कामावर सुद्धा काढतात.
तसेच महिला कामगारां सोबत असभ्य वर्तन करतात अशा तक्रारी आजपर्यंत झालेल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा इतर वरिष्ठ सहकारी तसेच इतर कर्मचारी यांना सुद्धा डॉ. सोनारकर जुमानत नाही. त्यांच्या विरोधात सामान्य रुग्णालयात मोठा असंतोष आहे.
परंतु राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कोणी बोलण्यास धजावत नाही. त्यांची चंद्रपुरातील कालमर्यादा संपलेली असताना सुद्धा केवळ राजकीय पाठबळाच्या भरवशावर त्यांना येथे ठेवण्यात आलेले आहे.
यापूर्वी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्र व बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असताना सुध्दा त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे.
कोविड मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना पुरेशा सुविधा देण्यात येत नाही.शासनाच्या निर्देशानुसार विश्रांतीसाठी आवश्यक सुट्ट्या सुध्दा देण्यात येत नाही. याबाबत विचारणा करायला केलेल्या कंत्राटी कामगारांना डॉक्टर सोनारकर कामावरून काढण्याची धमकी देतात.
वैद्यकीय महाविद्यालयातील दोन कंत्राटी कामगार आजपावेतो पॉझिटिव्ह निघालेले आहेत. दिनांक 5 ऑगस्ट रोजी आर्थिक व मानसिक ताणांमुळे संगीता पाटील या महिला कामगारांचा कामावर असताना हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे.
डाॅ.सोनारकर यांच्या गैरवर्तणुकीचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याने गोर गरीब व गरजू नागरिकांना फटका बसत असुन त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जन विकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी पत्राद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेली आहे.