संतापजनक; त्या कोरोनाग्रस्त बड्या हॉटेल व्यावसायिकासमोर प्रशासनाचे लोटांगण; सर्व नियमांत दिली सूट :दोन्ही हॉटेल सर्रासपणे सुरू :अधिकारी निरुत्तर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संतापजनक; त्या कोरोनाग्रस्त बड्या हॉटेल व्यावसायिकासमोर प्रशासनाचे लोटांगण; सर्व नियमांत दिली सूट :दोन्ही हॉटेल सर्रासपणे सुरू :अधिकारी निरुत्तर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : साभार : विषेश प्रतिनिधी 


एखाद्या घरी कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्या घराचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करून कुणालाही आत किंवा बाहेर पडण्यास मज्जाव केला जातो. त्या ठिकाणी छावणी उभारून पोलिसांकडून चोवीस तास निगराणी ठेवली जाते. कोरोना रुग्णाच्या घरात असणाऱ्या आणि संपर्कात येणाऱ्या सर्वांची चाचणी केली जाते. मात्र, हे सर्व किचकट आणि त्रासदायक नियम सामान्य नागरिकांसाठी. पण तुम्ही गर्भश्रीमंत असाल, तुमचे राजकीय नेते, अधिकारी यांच्यासोबत उठणेबसणे असेल तर मात्र यातील कुठलाही नियम तुम्हाला यत्किंचितही लागू होत नाही. उलट तुम्ही स्वतःचे वेगळे नियम करू शकता. असाच संदेश सध्या प्रशासन देत आहे. एक बड्या हॉटेल व्यवसायिकाचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळले असताना प्रशासनाने त्यांच्या दरबारात लोटांगण घातले की काय असे चित्र निर्माण झाले आहे. हा एकूणच प्रकार अत्यंत संतापजनक आणि प्रशासनाच्या पक्षपातीपणाचा पोल खोलणारा आहे. चंद्रपूर शहरातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाचे कुटुंबातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आहे. त्यांचा प्रशस्त बंगला आकाशवाणी मार्गावर आहे. हा बंगला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून मनपाने घोषित करण्यात आला पण तो केवळ नावापुरताच. कुठलेही प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यापूर्वी सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात मनपाचे पथक येऊन पाहणी करते, संपूर्ण परिसर निर्जंतुक केला जातो, याची माहिती पोलीस विभागाला देऊन तेथे चोवीस तास निगराणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, कोणालाही आत-बाहेर येण्यास मज्जाव केला जातो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम कोरोन्टीन करण्यात येते. मात्र मनपा प्रशासनाच्या सहकार्याने येथे हे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. साधा नाकाखाली मास्क गेल्यावर सामान्य व्यक्तीकडून दोनशे रुपये वसूल करणारे प्रशासन यावेळी मात्र या बड्या कुटुंबाला सर्व सूट देण्यात धन्यता मानत आहे. या बंगल्याचा एक दरवाजा जीवनावश्यक वस्तूसाठी खुला राहण्याची सुविधा केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी संपूर्ण परिसरच सील केला जात असल्याचे दिसून येते. त्यातही कळस म्हणजे या बंगल्याची निगराणी करण्यात जी दोन पाळीची सुरक्षा यंत्रणा आहे ती प्रतिबंधात्मक क्षेत्र घोशीत केल्यावरही दोन दिवस कायम होती. म्हणजे तब्बल दोन दिवस खासगी सुरक्षा कर्मचारी 12 तास काम करून घरी जाऊन परत येत होते. त्यातही कळस म्हणजे हे कर्मचारी दरवाज्यातून प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या आतबाहेर करीत होते. एकीकडे कोरोनाचा प्रसार भयंकररित्या वाढत असताना प्रशासन अशा प्रकारे विशिष्ट वर्गाला सुट देऊन या स्थितीला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. त्याला राजकीय वरदहस्त आहे. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे. ⭕ दोन्ही हॉटेल सर्रासपणे सुरू

ह्या प्रतिष्ठित व्यावसायिकाचे दोन मोठी हॉटेल्स आहेत. त्यातील एक हॉटेल हे कोरोना योद्धा डॉक्टरांसाठी आरक्षित आहे. मात्र येथे हॉटेलचा स्टाफ काम करतो. हा प्रकार समोर आल्यावर किमान कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन त्याचा परिणाम येईपर्यंत हे हॉटेल्स बंद ठेवणे आवश्यक होते. हे हॉटेल अत्यंत प्रसिध्द आहे. येथे कोरोनाग्रस्त मालकांची दररोज येजा होत होती. ते काऊंटरवर बसत होते, अनेक कर्मचाऱ्यांशी त्यांचा थेट संबंध येतो. त्यामुळे संपूर्ण हॉटेल बंद ठेवणे गरजेचे होते. मात्र मनपाने याची कानोकान कुणाला खबर होऊ दिली नाही. मात्र ही दोन्ही हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांना देखील याची भनक लागली नाही. गरीबांचे गाळे, दुकाने दिसली तर कारवाई करणारे मनपा प्रशासन मोठ्या लोकांना मात्र, यात सूट देत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 


⭕ अधिकारी निरुत्तर

याबाबत सहायक आयुक्त विशाल वाघ, शीतल वाकडे आणि यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्याकडे या प्रकाराबद्दल कुठलेही ठोस उत्तर नव्हते.