आता वाघ -बिबट -अस्वल दत्तक घेता येणार :गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक देणे सुरु : animals-can-be-adopted-from-gorewada-zoo - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता वाघ -बिबट -अस्वल दत्तक घेता येणार :गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील प्राणी दत्तक देणे सुरु : animals-can-be-adopted-from-gorewada-zoo

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

महाराष्ट्र शासनाने २००५ च्या शासन निर्णयानुसार गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २९ नोव्हेंबर २०११ च्या निर्देशानुसार प्राणीसंग्रहालयाची स्थापना महाराष्ट्र वनविभाग महामंडळामार्फत करण्याचा निर्णय झाला. या प्रकल्पातंर्गत २०१५ मध्ये वन्यप्राणी बचाव केंद्र व चिकित्सालयाची उभारणी केली.


नागरिकांना वन्यप्राण्यांचे महत्व व त्यांच्या रक्षणाबाबत माहीती व्हावी, तसेच या कामासाठी जनसामान्यांचा हातभार लागावा या दृष्टीकोनातून वन्यप्राणी बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना दत्तक देण्यासाठी वन्यप्राणी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. यापुर्वी गोरेवाड्यातील वाघ दत्तक घेण्यात आला आहे. तर काही दिवसांपुर्वी गोरेवाड्यात दाखल झालेल्या चार बिबट पिल्लांपैकी तीन बिबट पिल्लांना काही दानदात्यांनी दत्तक घेतले आहे.


३० जूनला अकोला येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मोर्णा नदीच्या किनाऱ्यावरील पास्टूल परिसरात असलेल्या झुडपांमध्ये ही पिले परिसरातील गावकèयांनी दिसली होती. पिलांना जन्म देवून त्यांची आई तिथून निघून गेली. यादरम्यान वनविभागाने घटनेची माहीती मिळताच पिलांना आपल्या ताब्यात घेतले. एवढेच नाही तर काही दिवस या परिसरात या बिबट्यांच्या पिल्लांना ठेवण्यात आले होते. या पिलांची आई परत आल्यास पिलांना नेईल या उद्देशाने वनविभागाने काही दिवस वाट पाहिली. परंतू मादी बिबट परतलीच नाही. तसेच पिल्लं खूप लहान असल्याने पुढील देखभालीसाठी या पिल्लांना गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात १६ जुलैला आणण्यात आले. या चार पिल्लांपैकी दोन नर तर दोन मादी असून चारपैकी तीन पिल्लांना वन्यजीव प्रेमींनी दत्तक घेतले आहे.


यात एका नर बिबटला ए आर कन्स्ट्रक्शन यांनी दत्तक घेतले असून त्याचे मुफासा असे नाव ठेवले आहे. तर एका मादी पिलाला डॉ. आयुषी देशमुखने दत्तक घेतले असून तिचे नाव हंटर तर डॉ. रोशन भिवापूरकर यांनी आणखी एका बिबट पिलाला दत्तक घेत तिचे नाव डायना असे ठेवले आहे. या बिबट पिलांना १ वर्षांसाठी दत्तक घेण्यासाठी ५० हजार रुपये प्रती बिबट पिलू शुल्क आकारण्यात येणार आहे.


याशिवाय गोरेवाड्यात वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी असून हे देखील वन्यजीवांना दत्तक घेता येणार आहे. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात दत्तक घ्यावे असे आवाहन गोरेवाडा प्राणीसंग्रहालय प्रशासनाने केले आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेतंर्गत आत्तापर्यंत डॉ. सुश्रृत बाभुळकर, डॉ. सुयोग रत्नपारखी, रीना सिन्हा यांनी प्राणी दत्तक घेत गोरेवाडा प्रकल्पास मदत केली आहे.

⭕️ वन्यप्राणी चिकित्सालय येथे सध्यास्थितीत दत्तक योजनेतंर्गत उपलब्ध असलेले वन्यप्राणी पुढीलप्रमाणे-

वन्यप्राण्यांची प्रजाती - संख्या- वन्यप्राणी दत्तक घेण्याचे मासिक व वार्षिक दर 

🐅वाघ - ९ - ३० हजार - ३ लाख ५० हजार.

🐆बिबट - २३ - १३ हजार - १ लाख ५० हजार.

🐯बिबट पिलू - १ - - - ५० हजार.