शनिवार, 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. यंदा कोरोनामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मोठी घट झाली असून, आतापर्यंत धर्मादाय आयुक्त कार्यालयात केवळ 24 मंडळांचीच नोंदणी झाली आहे. परंतु, घरघरांत बाप्पाचा उत्साह कायम असून, जवळपास 15 ते 20 हजाराहून अधिक घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. कोरोनामुळे यंदा बाप्पाला घरी नेताना ढोलताशांचा आवाज कानी पडला नाही. कारण मिरवणुकीला बंदी आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने भक्तांनी श्रीची मूर्ती घरी आणली.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते. हा उत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली जाते. मूर्तीकारही महिनाभरापासून मूर्ती तयार करण्याचे काम करतात. पण, यंदा गणेशोत्सवाचा उत्साह केवळ घराघरांमध्ये दिसून येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
त्यामुळेच की काय, यंदा सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मोठी घट झाली आहे. दरवर्षी साधारणतः दीड हजारांवर सार्वजनिक गणेश मंडळांत बाप्पाची स्थापना केली जाते. पण, यंदा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे शुक्रवारपर्यंत केवळ 24 मंडळांनीच नोंदणी केली आहे. कोरोनाच्या सावटात शासन-प्रशासनाला सहकार्य करण्यास गणेश भक्तही जागृत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, यंदाचा गणेश उत्सव साजरा करताना नियम पाळावे. विसर्जनसमयी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी सर्वच घरगुती गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात कुठल्याही स्वरूपाची मिरवणूक काढता येणार नाही.
सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फुटाच्यावर नसावी आणि सार्वजनिकरित्या कुठलेही कार्यक्रम होणार नाही, याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घ्यावी. मंडपांवर नियंत्रण असून, यावर प्रशासनाची नजर राहणार आहे. घरगुती गणेशाचे विसर्जन यंदा भाविकांनी घरीच करावे, असे आवाहन महापौर व आयुक्त यांनी केले आहे.
भक्तांची श्रद्धा अफाट आहे. कोरोनाचा त्यावर काहीच परिणाम झालेला नाही. घरगुती गणेश मूर्ती स्थापन करण्याचा उत्साह भक्तांमध्ये कायम आहे. मातीच्या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने चांगल्या असतात. पण, पीओपीच्या मूर्तीची खुलेआम विक्री केली जात आहे. त्याचा मातीच्या मूर्ती विक्रीवर परिणाम होत असल्याचे मत मूर्तीकार रामचंद्र ताटकंटीवार यांनी व्यक्त केले.
पर्यावरणास हानीकारक ठरणार्या पीओपी मूर्तीची बाजारात सर्रास विक्री सुरू आहे. पण, यावर मनपा प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना आखल्या नाहीत. शासनाने पीओपी मूर्तीवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे आपण विक्रीवर बंदी घालू शकत नाही. केवळ नागरिकांना पीओपी मूर्तीची खरेदी करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे केल्याची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.