कोट्यवधी रुपयांची पोलिस वसाहत रहिवाशांच्या प्रतीक्षेत : घरकचऱ्याच्या दुर्गंधीने पोलिसदादा अद्यापही किरायाच्या घरांत :सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती फाईलच गहाळ:#The police colony built up with Billions of rupees waiting for the residents - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोट्यवधी रुपयांची पोलिस वसाहत रहिवाशांच्या प्रतीक्षेत : घरकचऱ्याच्या दुर्गंधीने पोलिसदादा अद्यापही किरायाच्या घरांत :सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती फाईलच गहाळ:#The police colony built up with Billions of rupees waiting for the residents

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी :


अनेक वर्षांपासून पोलिसांना हक्काचे घर मिळावे म्हणून येथील पोलिस जवान प्रतीक्षा करीत होते. त्यांची प्रतीक्षा सन 2013-14 साली संपली. कोट्यवधी रुपये मंजूर होऊन सुसज्ज अशी पोलिस अधिवास इमारत निर्माण करण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन सुध्दा पार पडले.मात्र, समोरील घनकचरा प्रकल्पाची दुर्गंधी पसरते या कारणाने पोलिस जवानांना अद्यापही किरायाच्याच घरात राहावे लागत असल्याची वास्तव परिस्थिती आहे.
तालुक्याचा परीघ फार विस्तीर्ण आहे. संपूर्ण तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम पोलिस विभागावर आहे.

येथील ठाण्याला चार अधिकारी, एक ठाणेदार व ७६ पोलिस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. तालुक्यात ७५ ग्रामपंचायती तर अनेक गावांचा गट ग्रामपंचायतींमध्ये समावेश होतो. अनेक वर्षांपासून पोलिस कर्मचारी किरायच्या घरात राहतात. कामाचा व्याप लक्षात घेता किमान पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे ही मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. तत्कालीन आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या काळात येथील गांधीनगर जवळील शासकीय जागेत पोलिस वसाहतीचे बांधकाम करण्याकरिता जागा निश्चित करण्यात आली.

त्याबाबत प्रशासकीय अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने ३०/१/२०१३ ला ७ कोटी ९१ लाख ८६ हजार रुपये मंजूर केले. तत्कालीन आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून येथील बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील काळात पूर्ण करून घेतले. सध्या येथे दोन वरिष्ठ अधिकारी तर ५२ घरे पोलिस कर्मचारी यांच्याकरिता तयार करण्यात आले आहेत. सदर बांधकाम हे वेगवेगळ्या तीमजली इमारती तयार करून फ्ल्याट् स्किमनुसर तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी विजेची पूर्ण व्यवस्था तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कालांतराने विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सदर इमारतीचे उद्घाटन पार पडले.

संपूर्ण शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्वीच्या काळात पोलिस वसाहत इमारतीच्या समोरील भागात आणण्यात आले. या ठिकाणी घनकाचऱ्यावर विविध प्रकारची प्रक्रिया करण्यात येते. या प्रकल्पातील दुर्गंध सर्वत्र पसरतो त्यामुळे पोलिस कर्मचारी पोलिस अधिवासात राहण्याकरिता जात नसल्याचे कारण समोर आले आहे. शिवाय परिसरात शारदा कॉलनी, गांधीनगर, आंबेडकर महाविद्यालय वसलेले आहेत.त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने यावर तोडगा काढावा. येथील घनकचरा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा पोलिस वसाहतीकरिता करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा शासकीय खर्च वाया जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

येथील नगरसेवक तथा उपाध्यक्ष अशोक रामटेके यांना याबाबद विचारणा केली असता पोलिस विभाग किंवा बांधकाम विभागाकडून घनकचरा प्रकल्पाबाबत कोणतेही पत्र नगरपरिषद प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाल्यास समोरील आमसभेत विषय मांडण्यात येऊन त्यावर कसा तोडगा निघेल याविषयी चर्चा करण्यात येईल असे ते म्हणाले.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती फाईलच गहाळ:

याबाबत सदर प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोलिस वसाहतीकरिता तयार करण्यात आलेले व मंजूर अंदाजपत्रक किती ? हे जाणून घेण्याकरिता वारंवार विचारणा केली. परंतु यापूर्वी जे अधिकारी होते ते बदलून गेले. त्याच्याकडे ती फाईल असेल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ती फाईल नेमकी कुठे आहे. की गहाळ झाली असा प्रश्न निर्माण होत आहे.