गौनखानिज वाहतुकीच्या महसुल नियमांना वाकुल्या घर बांधकामाकरिता खोदलेल्या खड्ड्यातून गौण खनिजाची वाहतूक #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गौनखानिज वाहतुकीच्या महसुल नियमांना वाकुल्या घर बांधकामाकरिता खोदलेल्या खड्ड्यातून गौण खनिजाची वाहतूक #bramhpuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी: 

कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेची रीतसर परवानगी घ्यावी लागते.   इमारतीचा भक्कम पायवा तयार करण्यासाठी किंवा तळघर बांधण्यासाठी  मोठे खड्डे खोदून बांधकाम करण्याचा प्रकार शहरात सुरू आहे. या खोदकमतून बाहेर निघणारा गौण खनिज इतरत्र वाहतूक करण्यात येतो.याकरिता महसूल  विभागाची अधिकृत परवानगी असणे गरजेचे आहे.  परंतु असे न करता सर्व नियमांना तिलांजली देत शहरात बिनबोभाटपणे असे खोदकाम व गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक  सुरू आहे. अशा प्रकारची वाहतूक नियमबाह्य असून यावर महसूल विभागाने कारवाई करणे आवश्यक आहे.
       
शिक्षणाचे माहेरघर, वैद्यकीय नगरी म्हणून ओळख असलेल्या ब्रम्हपुरी शहराचा विकास झपाट्याने झाला. मागील दहा ते पंधरा वर्षात शहराच्या चारही बाजूने नवे लेआऊट, व त्याच प्रमाणात नवीन घरे, वस्त्या निर्माण झाल्या. सर्व सोईंनी परिपूर्ण व शांत शहर म्हणून नोकरी निमित्ताने येणाऱ्या अनेकांनी या शहराला पसंती दिली. त्यामुळेच अगदी अल्पावधीत शहराचा परीघ विस्तारला आहे. नागपूर रोडवरील जुन्या देलनवाडी पर्यंत, वडसा रोडवर खुल्या जागेत व परिसरात नव्याने लेआऊट निर्मिती झाली. तर आरमोरी रोडवर अगदी उदापूर पर्यंत घरांची दाट वस्ती निर्माण झाली. शिवाय चांदगाव रोड, मालडोंगारी रोड, नवेगाव ( मक्ता) या ग्रामपंचायत क्षेत्रातही नव्याने घरे, तीन मजली इमारती उभ्या झाल्या आहेत.
      
तर शहरात अनेक ठिकाणी वाणिज्य वापाराकरीता गडगंज इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. यातील काही अपवाद वगळता बहुतांश इमारत बांधकामाकरिता नगर परिषद प्रशासनाकडे परवानगी घेण्यात आली आहे. परंतु शहराचा चारही बाजूने विकास होत असताना काहींनी इमारतीत तळघर, पार्किंग व्यवस्था ही जमिनीच्या खाली करण्याकरिता किंवा मोठ्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भला मोठा खड्डा खोदून या ठिकाणच्या गौण खनिजाची इतर ठिकाणी वाहतूक देखील केली आहे. अशा प्रकारची अनेक बांधकामे  तीन चार वर्षे आधी करण्यात आली आहेत. तर अनेक बांधकामे अद्यापही करण्यात येत असल्याचे दिसून येते. 

अशा प्रकारचे खोदकाम व खोदकानातून निघालेल्या गौण खनिजाची इतर ठिकाणी वाहतूक करावयाची असल्यास तशी महसूल विभागाची रीतसर परवानगी घेऊन व सदर विभागाने आकारून दिलेल्या शुल्काचा भरणा करावा लागतो. असे न केल्यास सदर विभागाकडून अशा इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. जुन्या प्रकरणातही अशी कारवाई सदर विभाग करू शकतो.
        
सध्या फ्लॅट निर्मितीला शहरात चालना मिळाली असून अनेक भागात बांधकाम सुरू आहेत. तर वाणिज्य वापरकरीता अनेक मोठ्या इमारतीही बांधण्यात येत आहेत. या इमारतींचे पक्के बांधकाम करण्यासाठी म्हणून औरस चौरस मोठे खोल खड्डे  खोदून हे बांधकाम करण्यात येत आहेत. या खोदकमातून बाहेर निघालेल्या गौण खनिजाचा वापर तेथेच करावयाचा शासकीय नियम आहे. याशिवाय त्या बांधकामाकरिता वापर होत नसेल, व इतर ठिकाणी गौण खनिजाची वाहतूक करावयाची असल्यास रीतसर महसूल विभागाची परवानगी घेऊन शुल्क भरावा लागतो. मात्र, महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत अशा प्रकारच्या गौण खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. महसूल नियमांना वाकुल्या दाखवत सर्रासपणे अशी वाहतूक करण्यात येत आहे. गौण खनिज वाहतुकीवर आळा घालून शासकीय महसूल वाचविण्यासाठी सदर महसूल प्रशासनाने  कारवाई करणे गरजेचे आहे. 
                              
⭕️ त्या खोदकामात गौण खनिज वाहतुकीला महसूल विभागाचे अभय : 

मागील कालावधीत नागरे रुग्णालयासमोर ७० फूट लांब ४० फूट रुंद व २० फूट खोल खड्डा एका नगरसेवक पुत्राने खोदला होता. बाजूच्या इमारतींना येथे साचलेल्या पाण्याने धोका असल्याने नगर प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली.कारवाई थातूरमातूर होत असल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी शपथपत्र दखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

या खड्ड्यातील गौण खनिजाची वाहतूक सदर मालकाने आपल्या मालकीच्या टिळकनगर येथील जागेत केली होती.  या प्रकरणाचे वृत्त विविध माध्यमातून प्रकाशित झाले होते.मात्र, सदर खड्ड्यातील गौण खनिजाची वाहतूक होऊनही महसूल विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.