विहारात सुरू झाली 'अनिकेतची' ज्ञानशाळा ! चिमुकल्यांना शिक्षण : भंगाराम तळोधी येथे अनिकेत दुर्गेचा प्रेरणादायी उपक्रम #lockdown_moments - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विहारात सुरू झाली 'अनिकेतची' ज्ञानशाळा ! चिमुकल्यांना शिक्षण : भंगाराम तळोधी येथे अनिकेत दुर्गेचा प्रेरणादायी उपक्रम #lockdown_moments

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे गाव, शहर बंद आहे. शाळाही बंद आहे. त्यामुळे गावातील चिमुकले घरात आणि परिसरात खेळताना दिसतात. त्यांना ना कोणी सांगणारे ना बोलणारे, अशावेळी बालकांना संस्काराचे धडे दिले तर नक्कीच कोवळ्या मनावर सकारात्मक परिणाम होतात. सामाजिक जाणीव असणाऱ्या अशाच एका तरुणाने गावातील चिमुकल्यांना एकत्र करून गावातील विहारातच ज्ञानशाळा सुरू केली. विहारातून संस्कारामय ज्ञानाचे झरे पाझरू लागले. भंगाराम तळोधी येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत नामेश्वर दुर्गे (२०) या तरुणाचा हा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरत आहे.

अनिकेत दुर्गे हा चंद्रपूर येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी. तो उत्कृष्ट वक्ता तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय असतो. गावात आल्यानंतर लाॅकडाऊनमुळे मुलांची शाळा बंद असल्याने मुले दिवसभर अशीच इकडे तिकडे खेळताना त्याला जाणवले. आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग यादरम्यान या मुलांसाठी व्हावा असे त्याच्या मनात आले. त्यासाठी त्याने गावातील मुलांना शिकवण्याचे ठरवले. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन व मुलांच्या आईवडिलांची परवानगी घेऊन त्यांने हा उपक्रम सुरु केला. यासाठी गावातील विहाराची निवड केली. अनिकेतने स्वतः मुलांना सोबत घेऊन विहार स्वच्छ केले अन गावातील ३० मुलांची दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळात ज्ञानशाळा सुरू झाली.

अनिकेतच्या ज्ञानशाळेत मुले रोज वेळेवर शिस्तीत हजर होतात. सुरुवातीला 'हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही प्रार्थना घेण्यात येते. बुद्धवंदना घेण्यात येते. हसत-खेळत शिक्षण म्हणून गंमतीचे गीत, मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच जनरल नॉलेजचे रोजचे प्रश्न, प्रेरणादायी गोष्टी, तसेच पुढील दिवसाचा गृहपाठ देखील दिला जातो. वंदे मातरम या गीताने ज्ञानशाळेचा समारोप होतो. अनिकेतच्या या ज्ञानशाळेत विद्यार्थी कमालीचे एकरूप झाले असून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. त्याच्या ज्ञान शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतची विद्यार्थी आहेत. अनिकेतच्या या उपक्रमाने गावातील मुलांना अभ्यासाची सवय, शिस्त लागल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. 

⭕️ लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन व नागरिकांचे सहकार्य :


अनिकेतच्या ज्ञानाशाळेची माहिती समाजमाध्यमातून होताच अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. मुलांसाठी पेन, बुक यासह मास्क व सॅनिटायझर उपलब्धतेसाठी नागरिकांनी आर्थिक सहाय्य केले. मुलेदेखील सोशल डिस्टन्सचे पालन करून रोज ज्ञानेशाळेत हसत खेळत उत्साहाने येत आहेत. अनिकेतचा हा उपक्रम प्रेरणादायी असून जोपर्यंत माझी व मुलांची शाळा सुरु होणार नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरु राहील. प्रत्येक गावा-गावातील युवकांनी या काळात समाजहिताचे कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत अनिकेतने व्यक्त केले.