भष्टाचार ब्रेकिंग : मानव मिशनच्या निधीवर शिक्षण विस्तार अधिकार्‍यांचा डल्ला! #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भष्टाचार ब्रेकिंग : मानव मिशनच्या निधीवर शिक्षण विस्तार अधिकार्‍यांचा डल्ला! #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सावली -

सावली पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी व विद्यमान शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग कुमरे यांनी मानव मिशन अंतर्गत मिळणार्‍या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. तब्बल 2 लाख 37 हजार रूपयाची अफरातफर केल्याची बाब चौकशी अहवालात सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शासनाचा निधी स्वतःच्या खात्यात वळते केल्याची गंभीर बाब चौकशीत समोर आल्याने जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या सोमवारी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा, मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून लाखो रूपयाचा निधी खर्च केला जातो. पण, गुणात्मक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सावली पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी केले. 

मानव मिशन अंतर्गत मिळणार्‍या निधीतून किचन शेड बनविणे व अन्य शैक्षणिक कामांवर खर्च केला जातो. पण, त्यांनी या सार्‍या बाबींना बगल देत, पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या बँक खात्यावर ती रक्कम वळती केली. शिवाय त्यांच्यावर पदाधिकार्‍यांचा जाणून-बुजून अपमान केल्या जात असल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. तसेच ते पदाधिकारी व सामान्यांना विविध कामांसाठी पैशाची मागणी करतात, अशा आशयाच्या तक्रारीही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले व पंचायत समितीच्या माजी सभापती छाया शेंडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी वित्तीय लेखासंहितेचा भंग केल्याची बाब समोर आली. त्यांनी 2 लाख 37 हजार रूपयाचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले.


चौकशीत दोषी आढळल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. मात्र, त्यांनी खुलासाच सादर केला नाही. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या सभेत त्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सभाध्यक्षांनी दिले. शिक्षण विस्तार अधिकारी आर्थिक अफरातफरीत दोषी आढळून आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाणार असून, चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

कुमरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव  पाठविणार : कर्डिले

सावली पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गट शिक्षणाधिकारी व विद्यमान शिक्षण विस्तार अधिकारी श्रीरंग कुमरे यांनी 2 लाख 37 हजार रूपयाचा गैरव्यवहार केल्याची बाब चौकशीत सिद्ध झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोमवार, 29 जून रोजी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी तभाला दिली.