बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासात सहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ओदिशा, आंध्र प्रदेशात उत्तर किनारपट्टीचा प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांमध्ये ९ ने ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
पुढच्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात पूर्व मध्येला कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये ९ ते ११ जून दरम्यान तर महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये १० ते ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटक, रायलसीमापर्यंत पोहोचला आहे. बहुतांश तामिळनाडूचा भागही मान्सूनच्या पावासाने व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मान्सून मध्य अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक आणि कोकणाचा भाग लवकरच व्यापून टाकेल.