केंद्र सरकारने शेतमाल ( अन्नधान्य ) जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या जाचक कचाट्यातून बाहेर काढले,हा शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांच्या संकल्पनेचा आणि शेतकरी संघटनेचा चाळीस वर्षातील संघर्षाचा विजय आहे, याबद्दल महाराष्ट्र प्रांतीय शेतकरी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.
शेतकरी संघटनेने सन 1980 पासून जीवनावश्यक वस्तू कायदा - 1955 या कायद्याच्या तरतूदीतुन शेतमाल (अन्नधान्य ) बाहेर काढावे आणि कालबाह्य झाल्यामुळे हा कायदा रद्द करावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी बाजपेयी यांच्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री मा. यशवंत सिन्हा यांनीही सन 1999 मध्ये लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना केलेल्या भाषणात हा जीवनावश्यक वस्तूचा कायदा कालबाह्य झाला आहे व त्यातून शेतमाल वगळला जाईल, असे सांगितले होते.
त्यानंतर संयूक्त पुरोगामी आघाडी सरकारचे अर्थमंत्री मा.पी.चिदंबरम यांनीही हा कायदा कालबाह्य झाला आहे आणि शेतमाल यातून वगळला जाईल,असे सांगितले होते. परंतु कुणीही प्रत्यक्ष कृती केली नाही.
एनडीए सरकारचे पाच वर्ष गेल्यानंतर सुद्धा याविषयी निर्णय झाला नाही. परंतु सध्या कोरोना या आजारामुळे देशभर आरोग्या सोबतच अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नाइलाजाने व इच्छा नसूनही पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.
शेतकरी संघटनेने गेल्या चाळीस वर्षांत राज्यसभेपासून विविध व्यासपीठावर तसेच शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात ठराव परित करून सातत्याने ही मागणी लावून धरली होती आणि अनेक आंदोलनाद्वारे ही मागणी प्रकर्षाने केली होती. परंतु आता परिस्थितीने सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.
जीवनावश्यक वस्तू कायद्यातुन अन्नधान्य वगळणे हा युगात्मा शरद जोशी व शेतकरी संघटनेने चाळीस वर्ष रेटून धरलेल्या लढ्याचा विजय असून याबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ऍड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, रामभाऊ नेवले, शैला देशपांडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, गीताताई खांदेभराड, संजय कोल्हे, मधुकर हरणे, सतीश दाणी, सुधीर बिंदू, मदन कामडी, सुमनताई अग्रवाल, ऍड.प्रकाश पाटील, डॉ.मानवेंद्र काचोळे,ललित बहाळे, प्रभाकर दिवे, विजय निवल, कडूअप्पा पाटील, गोविंदभाऊ जोशी, डॉ. निर्मला झगझाप, सीमा नरोडे, तुकाराम निरगुडे, अंजली पातूरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.