मालकाचा जीव वाचवितांना झिबलीने त्यागले प्राण, नाग आणि कुत्रीची झाली झुंज #dog-sneck - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मालकाचा जीव वाचवितांना झिबलीने त्यागले प्राण, नाग आणि कुत्रीची झाली झुंज #dog-sneck

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी - 

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. तो मरेपर्यंत माणसाची सेवा करतो. तसाच प्रत्यय काल आला. मालकाचा जीव वाचवितांना झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात काल घडली. परिसरात झिबली नावानी प्रसिद्ध असलेल्या कुत्रीच्या जाण्याने अख्खे गाव हळहळले.

वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील भास्कर चवले यांच्याकडे एक कुत्री होती. त्यांनी बारा वर्षापूर्वी ते पिल्लू आणले. त्यांचा मुलगा निखीलने त्या पिल्लाचं झिबली असं नामकरण केलं. दिवसामागून दिवस गेले. झिबली मोठी होऊ लागली. आणि तिने आपले कारनामे दाखविणे सुरू केले. 

गावातीलच शामदेव उमरे यांच्या गणपत नावाच्या कुत्र्यासोबत राहून अनेक गुण झिबलीने अंगिकारले. अनेकदा झिबली आणि गणपतनी रानडुकरांना पिटाळून लावले. सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी मिळून एका रानडुकराचा फडशा पाडला होता. दोघांनी मिळून अनेकदा  विषारी सापांना यमसदनी धाडले होते. गणपत आणि झिबलीची चांगली केमेस्ट्री जमली होती. तीन वर्षापूर्वी गणपतचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यावेळी अक्षरशः झिबली नावाची कुत्री रडल्याची आठवण गजानन उमरे सांगतात.

झिबली जरा हटके स्वभावाची कुत्री होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आकोला परिसरात तिचे अनेकजण चाहते झाले होते. झिबली नुसती माणसाळलेली नव्हती तर तिने मानवी स्वभावाशी, मानवी संवेदनेशी समरसता साधली होती. झिबलीला जेव्हा अन्न मिळायचे, तेव्हाच ती जेवण करायची. तिच्या प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरणे सांगण्यासारखे आहेत.

काल भास्कर चवले, त्यांची पत्नी शशिकला  मुले अनिकेत आणि निखील शेतात काम करित होते. 

झिबली शेतात खेळत होती. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने झिबलीला येतांना दिसला. आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला. काही वेळानी चवले कुटूंबियांना ही होत असलेली झटापट लक्षात आली. त्यामुळे हातचे काम टाकून  ते सर्वच धावले. त्यावेळी झिबलीच्या तोंडात मृत नाग असल्याचे त्यांना दिसले. चवले परिवार झिबलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना तिने आपले प्राण त्यागले.

झिबली आणि नागाच्या झुंजीची बातमी वार्यासारखी गावात पसरली. अनेकजण तिला पहायला शेतात आले. झिबलीच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण गाव हळहळले. झिबलीने चवले आणि गावाची बारा वर्ष इमाने- इतबारे सेवा केली. तिची अचानक झालेली  एक्झिट सर्वांना चटका लावून गेली. त्यानंतर झिबलीची अंतयात्रा काढून शेतात पुरण्यात आले. 

तिच्यात असलेल्या गुणामुळे झिबलीची आम्हाला नेहमीच आठवण येणार आहे, तिची कमतरता जाणवणार असल्याचे शामदेव उमरे, सदाशिव उमरे, केशव उमरे , अरूण उमरे आदींनी सांगितले. झिबलीचा सहवास लाभलेल्या चवले कुटूंबियांनी झिबली नेहमी स्मरणात राहावी म्हणून ३० जूनला छोटेखानी तेरवी करण्याचा निर्णय घेतला आहे. झिबलीने आपल्या मालकाचा धोक्यात असलेला जीव वाचवित नागाशी दोन हात केले. आपला जीव धोक्यात घालून जिवाची पर्वा न करता झिबली शहीद झाली. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.