जाणून घेऊया ! कापूस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करण्याचे आवाहन :जूनमध्ये करावयाची कार्यवाही :बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी : डॉ. उदय पाटील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी #diochandrapur-cotton-cultivation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाणून घेऊया ! कापूस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करण्याचे आवाहन :जूनमध्ये करावयाची कार्यवाही :बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी : डॉ. उदय पाटील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी #diochandrapur-cotton-cultivation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेती मशागत तसेच इतर शेती कामांवर परिणाम झाला असून तोंडावर आलेल्या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून शेतीच्या कामाचे नियोजन हे क्रमप्राप्त आहे. हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे. ही बाब निश्चितच शेतकऱ्यांसाठी समाधानाची आहे. सध्या सर्वत्र शेती मशागत कामांना वेग आला असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते तसेच इतर निविष्ठा खरेदीची लगबग दिसून येत आहे. त्यादृष्टीने कापूस पिकाचे योग्य नियोजन करून कापूस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याकरिता आणि कपाशीची गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता व शाश्वत उत्पादनाच्या हमीसाठी शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

जूनमध्ये करावयाची कार्यवाही :

बियाणे खरेदी करतांना पक्‍क्‍या बिलासह नामांकित कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे तसेच विद्यापीठ निर्मित सुधारित व सरळ वाण खरेदी करावे.कोरडवाहू कापसाची पेरणी 15-30 जून किंवा मान्सूनचा 75 ते 100 मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर लवकरात लवकर पेरणी करावी. जांभूळवाही केल्यास तणांचा प्रादुर्भाव 20 टक्क्यांनी कमी होतो.

विदर्भामध्ये कपाशीचे पीक बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे या पिकासाठी उत्तम जलधारण शक्ती असणारी जमीन निवडावी. अति खोल व 90 सेंटिमीटर च्यावर खोल जमिनीमध्ये कपाशीचे सलग पीक घ्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार कापुस वाणाची निवड करावी. तसेच पिकाच्या लागवडीत अंतर ठेवावे. उथळ व हलक्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड करू नये.

मागील वर्षी ज्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद किंवा ज्वारी यासारखी पिके घेतली. त्या शेतात पीक फेरपालट म्हणून कपाशीची लागवड करावी.भारी काड्या कापसाच्या जमिनीकरिता रस शोषक किडीस सहनशील( लवयुक्त) 180 दिवसांपेक्षा कमी कालावधीचे बीटी हायब्रीडची निवड करावी.

मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकती करिता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस-मूग, किंवा कापूस-उडीद किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जातीचा अवलंब करावा. तसेच कपाशी+ ज्वारी+तूर +ज्वारी कपाशीच्या 6, ज्वारीच्या 1 तर तुरीच्या 2 ओळी या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच कपाशीच्या 8 ते 10 ओळी नंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.

नॉन बीटी कपाशीची लागवड शेतकरी करीत असल्यास गाउचो या किटकनाशकाची बीज प्रक्रिया 3 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी.

खते जमिनीवर न टाकता पायाभूत खताची मात्रा बियाणे सोबत यंत्राद्वारे पेरून द्यावा. पेरणी झाल्यावर जमिनीवर खते फेकू नये असे खत हवेत विरून जाऊन पिकास उपयोगी येत नाही. कोरडवाहू अमेरिकन सुधारित कापूस लागवडीकरिता एकेएच-09-5( सुवर्ण शुभ्रा), पिकेव्ही रजत,एकेएच-8828, हे वाण 60×30 सेमी अंतरावर पेरावे.एकेएच-081 या वाणाची 60×15 सेमी अंतरावर पेरणी करावी. रासायनिक खताची मात्रा 60 किलो नत्र,30 किलो स्फुरद,  30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावी.( 65 किलो युरिया,187 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो म्युरेट ऑफ पोट्याश) आणि लागवडीनंतर 30 दिवसांनी किलो युरिया प्रति हेक्‍टरी द्यावा.

अति घनता लागवडीकरिता एकेएच-081 या वाणाची 60×10 सेमी अंतरावर हेक्‍टरी 15 किलो बियाणे घेऊन लागवड करावी.देशी संकरित कापूस लागवडीकरिता पिकेव्ही डीएच-1 व पिकेव्ही सुवर्णा या वाणाची लागवड करावी. योग्य खत व्यवस्थापनाकरिता 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.( 65 किलो युरिया, 187 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) कोरडवाहू बीटी वाण 90×45 सेमी अंतरावर पेरावे. आणि ओलिताखाली हे अंतर 120×30 सेमी ठेवावे. कोरडवाहू बीटी कपाशी करिता 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद,30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.(65 किलो युरिया, 187 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) माती परीक्षणा नुसार रासायनिक खतांचे नियोजन करावे.

बागायती बीटी कपाशीसाठी 120 किलो नत्र,60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे.( 87 किलो युरिया 375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणी सोबत व पेरणीनंतर 30 दिवसांनी किलो युरिया आणि 60 दिवसांनी 87 किलो युरिया प्रति हेक्‍टरी द्यावा.

उगवन पूर्व तणनाशकाचा वापर : सुरुवातीच्या काळात शेत तणविरहित ठेवण्यासाठी व कपाशीच्या चांगल्या उगवणीसाठी उगवन पूर्व तणनाशकाचा वापर करावा. यामध्ये तण नियंत्रणासाठी पेडांमिथीलीन 38.7 टक्के या उगवण पूर्व तणनाशकाचे 1.5-1.75 किलो प्रती हेक्टरी, व्यापारी घटकाची( 20 ते 25 मिली प्रति 10 लिटर पाणी)किंवा डायुराॅन 80 टक्के डब्लु.पि या तणनाशकाची 1 ते 2 किलो प्रती हेक्टरी व्यापारी घटकाची (20 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाणी)या प्रमाणात पेरणीनंतर जमिनीवर फवारणी करावी.

बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.