मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारतर्फे दरवर्षी देशातील उच्च शिक्षण संस्थचे मूल्यांकन करुन मानांकनाची यादी जाहीर करीत असते. त्यानुसार सन २०१८-१९ या वर्षात देशातील २०० महाविद्यालयाची यादी जाहीर केली असून त्यात पडोली येथिल सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा समावेश असून १७१ व्या स्थानावर महाविद्यालयाने मजल मारली आहे.
या यादीत महाराष्ट्रातील एकंदर चार महाविद्यालयाचा समावेश असून त्यापैकी २ महाविद्यालये ही समाजकार्याचे शिक्षण देणारी आहेत. यात एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर यांचा समावेश असून गोंडवाना विद्यापीठांमधून मानांकन प्राप्त झालेले हे एकमेव महाविद्यालय आहे. ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनात आपल्या महाविद्यालयाला स्थान प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी कार्य करीत असतात.
प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांनी महाविद्यालयाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे हे माझे एकट्याचे यश नसून ते सर्वांचे यश आहे असे सांगून भविष्यातही आपले महाविद्यालय राष्ट्रीय मानांकनात तसेच विद्यापीठात अग्रेसर कसे राहील त्यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार असून बदलत्या काळानुसार आपल्यालाही शिक्षण पद्धती संदर्भात बदल करावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्कीग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) मध्ये गुणात्मकतेच्या बाबतीत महाविद्यालयाने जे यश गाठले आहे. त्या संदर्भात सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे, सचिव मा.प्रशांतभाऊ पोटदुखे, उपाध्यक्ष मा. रमेशपंत मामीडवार, सहसचिव डॉ.किर्तीवर्धन दिक्षीत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.वि.सा.आईचवार यांनी प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आणि एन.आय.आर.एफ. साठी महाविद्यालयातील नोडल ऑफिसर म्हणून ग्रंथपाल प्रा.सिध्दार्थ वाकुडे यांचे अभिनंदन केले आहे.तसेच प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही कौतुक केले आहे.