प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे : बहुआयामी व्यक्तिमत्व -लेखक :प्रा. रविकांत वरारकर #ashok_jivtode - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे : बहुआयामी व्यक्तिमत्व -लेखक :प्रा. रविकांत वरारकर #ashok_jivtode

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वाढदिवस अष्टभिचिंतन 💐   
   
          
आजच्या आधुनिक परिस्थितीत शैक्षणिक वारसा चालवून त्यात समाजजागृतीची भर घालून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे पूर्व विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील धडपडं अग्रणी व्यक्तिमत्व आहे, प्राचार्य डॉ. अशोकभाऊ जीवतोडे.
            
दिनांक ११ जून १९६१ ला अशोकभाऊंचा जन्म चंद्रपूर येथे झाला. म्हणजे आज अशोकभाऊंचा साठावा वाढदिवस. आपल्या व्यक्तिमत्वातून इतरांना सतत प्रेरणा देणा-या अशोकभाऊंचा वाढदिवस हा हजारो लोकांसाठी विशेष दिन. 
          
अशोकभाऊंचे शिक्षण एम.कॉम., एम.एड., एम. फील. (वाणिज्य), एम. ए. (अर्थशास्त्र), पी. एचडी. (शिक्षणशास्त्र) व पी.एचडी. (वाणिज्य) पर्यंत झालेले आहे. अनेक जर्नल्समधे त्यांचे विविध विषयांवरचे लेख प्रकाशित आहेत. 

              
शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजींचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव अशोकभाऊ हे आज साठाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या विदर्भातील जुन्या व मोठ्या शैक्षणिक संस्थेचे ते मागील २५ वर्षांपासून सेक्रेटरी आहेत. शिक्षणक्षेत्रात त्यांची भरारी वाखाणण्याजोगी आहे. नागपूर, अमरावती, गडचिरोली विद्यापीठात त्यांनी महत्वाची पदे भूषविली आहेत. जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूरचे प्राचार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील बोर्ड ऑफ स्टडीजचे माजी चेअरमैन, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमैन व अधिष्ठाता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील बोर्ड ऑफ स्टडीजचे को-ऑप मेंबर होते. शासनाच्या अनेक शैक्षणिक कमिट्यांमध्ये ते असतात. त्यांच्या सखोल मार्गदर्शनात संस्था यशस्वीरीत्या वाटचाल करीत आहे. अनेक विद्यार्थी घडत आहेत. 

पुढे जाऊन प्रशासन, राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, चित्रपट, साहित्य, आदी क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. अनेक अडचणींवर मात करीत, संस्थेवर येणा-या छोट्या-मोठ्या समस्या निपटत, ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य अशोकभाऊ आपली अर्धांगिनी डॉ. सौ. प्रतिभा जिवतोडे यांच्यासोबत लीलया पेलत आहे.
          
संस्था चालविणे सोपं काम नाही. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी, प्रशासन, शिक्षण अधिकारी, पत्रकार, आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट, राजकारणी, समाजकारणी, सर्वांना सांभाळून सगळ्यांशी मधुर संबंध ठेवून संस्थेवर आंच येणार नाही, याची जबाबदारी अशोकभाऊ एकटेच पेलतात. आणि हे करतांना अशोकभाऊ कधीच कागद-कम्पूटर घेऊन बसलेले दिसले नाही. ते वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यांना सगळं मूकपाठ. काय करायचं आहे, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. एका कामाचा परीणाम दुसऱ्या कामावर कधी होत नाही. विषयांची सरमिसळ नाही. माणसं ओळखण्याची शैली जोरदार. कुणाला कोणतं काम सांगायचं, वेळीच कामं कसे करून घ्यायचे, हे त्यांच नियोजनबद्ध अ‍ॅडमीनीस्ट्रेशन असतं. 

पेंडिंग असं ते काहीच ठेवत नाही. एकाच विषयाला घोकत बसत नाही. आज एक काम झालं, दुसऱ्या दिवशी दुसरा विषय. भाऊंच्या जवळ असणा-यांना हे चांगलंच ठाऊक आहे. अशोकभाऊ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अथवा राजकीय कार्यक्रम घेत आहे तर तो भव्यदिव्यच असेल. कार्यक्रमाचं सर्व नियोजन भाऊ करतात. बारीक-सारीक गोष्टींबद्दल एवढं प्लॅनिंग की एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल. अशोकभाऊंचा कार्यक्रम अनुभवणारी लोकं याबाबत समजू शकतात. 

हे सगळं करीत असताना थकवा किंवा क्षीण नाहीच. सकाळी जेवढे फ्रेश असतात, तेवढेच सांयकाळी. दिवसभर विविध विषय हाताळतात, अनेक लोकांना भेटतात. एवढ्या मोठ्या संस्थेचा प्रमुख, पण कुणीही सहज भेटू शकतो, बोलू शकतो, अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. बडेजाव नाहीच, विनम्रता व स्वभावात सरळपना. बोलून मोकळं, राग आला तर आपल्या माणसांवर रागवतात देखील, पण, त्याचं वाईट कुणीच वाटून घेत नाही, दोन तासांनी पुन्हा त्यालाच जवळ घेऊन बसणार व मिश्किलपणे, 'चायला माझी बीपीच वाढून जाते', म्हणून हसवून टाकतात.
         
शैक्षणिक क्षेत्रात भाऊंची जेवढी भरारी तेवढीच सामाजिक क्षेत्रात पकड.पर्यावरणपूरक वृक्षलागवड, भव्य रक्तदान शिबिर, जनजागृतीपर भव्य कीर्तनाचे व व्याख्यानाचे कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ, ओबीसी समाज चळवळ, पूर्व विदर्भात सक्रियरित्या चालवीत आहेत. 

स्वतंत्र विदर्भ राज्य मिळावे, यासाठी नागपूर ते चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली ढवळून काढलं. विदर्भ चळवळीतला आजपर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम चंद्रपूर मधे अशोकभाऊंनीच लावला. विदर्भासाठी मतदान प्रक्रियेत पूर्णत: सहभाग घेतला. दरवर्षी १ मे ला विदर्भ राज्याचा प्रतिकात्मक झेंडा हजारो विदर्भप्रेमींसमक्ष फडकावितात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात ओबीसी चळवळ सक्रिय करण्याचे कार्य प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. 
       
ओबीसी समाजातील विविध जातींना एकत्रित आणून व जिल्ह्यापासून तर तालुका व गावपातळीपर्यंत ओबीसी समाजाच्या कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या. अधिवेशन, संमेलन, व्याख्यान, बैठका, आंदोलन, मोर्चा, निवेदन या माध्यमातून ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी प्रखर लढा उभा केला. 


दिनांक ८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ओबीसी समाजाचा 'न भूतो न भविष्यती' मोर्चा काढण्यात आलेला होता. यामधे चंद्रपूर जिल्ह्यातून बावीस हजारावर समाजबांधव स्वयं:स्फुर्तीने सहभागी होते. या मोर्चाचा परिपाक म्हणून राज्य शासनाने ओबीसी समाजाकरीता स्वतंत्र मंत्रीमंडळ स्थापन केले. हे डॉ. अशोक जीवतोडे यांच्या जनजागृतीचे फलीत म्हणावे लागेल. अशोकभाऊंच्या नेतृत्वात पूर्व विदर्भातून शेकडो ओबीसी बांधव दरवर्षी नागपूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आदी विविध ठिकाणी होत असलेल्या अधिवेशनाला हजेरी लावत असतात.
         
डॉ. अशोक जीवतोडे यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावर व वाड्:मयावर विशेष प्रेम आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या संघटन कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. प्रत्येक गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना व्हावी, यासाठी त्यांचे सहकार्य आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या अनेक कार्यक्रमांना आश्रय व सहभाग देण्याचा प्रयत्न सर्वश्रुत आहे. मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असावे, असा त्यांचा आग्रह असतो.
            
एखादे काम हाती घेतले की ते भव्यदिव्यच होऊ द्यायचे, व यशस्वी करून दाखवायचे, ही त्यांची ख्याती बनली आहे. समाजकार्यासाठी साधारणतः खिशातून शंभर रुपये काढायला कुणी तयार नसते. मात्र अशोकभाऊ सामाजीक कार्यावर हजारो-लाखो रुपये खर्च करतात. यासाठी कधी कुणाला पैसा मागितला नाही. 
        
अनेक पतसंस्थांना त्यांनी बळ दिलं. पतसंस्था मोठ्या केल्या. पर्यायाने सहकार क्षेत्राला हातभार लावला. अनेक लोकांना त्यांनी घडवलं, श्रीमंत बनविले, रोजगार दिला, मोठं केलं, अनेकांसाठी खपले, अपेक्षा ठेवली नाही. 
          
अशोकभाऊची राजकीय कारकीर्दही उल्लेखनीय आहेच. २००४ मधे अशोकभाऊंच्या मार्गदर्शनात नंदोरी-कोकेवाडा जिल्हापरीषदेची निवडणूक त्यांचे बंधू स्व. संजय जिवतोडे यांनी अपक्ष राहून जिंकली. २००४ च्या वरोरा-भद्रावती विधानसभा निवडणुकीत स्व. संजय जिवतोडे यांच्या उमेदवारीसह सक्रिय होते. त्यानंतर २००९, २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सक्रिय भुमीका ठेवली. पदवीधर मतदार संघात श्री. नितीनजी गडकरी (२००९), श्री. अनिलजी सोले (२०१५) व शिक्षक मतदार संघात श्री. गाणार (२०१०, २०१६) यांच्या प्रचारात महत्वाची भुमीका बजावली व यश मिळवून दिले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात श्री. नानाभाऊ शामकूळे (२००९, २०१४) यांना सहकार्य केले व विजयात सहभागी राहीले. 
      
भाऊंच्या अनेक चांगल्या गोष्टी सार्वजनिक होत नाहीत. आपल्या कर्मचा-यांना भाऊ जपतात. त्यांच्या विवाह कार्याला सपत्नीक हजेरी लावतात. एक किस्सा आठवतो, एका चतुर्थ श्रेणी गरीब कर्मचा-याला कॉलेजमधे येण्यासाठी दुचाकी हवी होती, त्याने भाऊला आर्थिक अडचण सांगितली, भाऊने लगेच त्याचदिवशी त्याला दुचाकी घेऊन दिली. कुणाला घर घ्यायला तर कुणाला लग्नासाठी भाऊने अनेकदा आर्थिक मदत केली आहे. सनवार असो, भाऊ कर्मचा-यांना विसरत नाहीत.
        
पुणे-मुंबई, नागपूर-हैदराबादच्या लेवलची शैक्षणिक सुविधा पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांकरिता चंद्रपूरमधे दहा वर्षांअगोदरच भाऊने निर्माण केली. जनता करिअर लॉन्चर या कोचिंग क्लासच्या माध्यमातून परिणामत: अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात गेले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना संस्थेच्या कोणत्याही शाखेत निःशुल्क प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. 
       
प्राचार्य डॉ. अशोकभाऊंविषयी लिहिण्यासारखं बरंच काही आहे. त्यांचा जीवनपट कार्याने भरला आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे अनगिणत आहेत.
          
भाऊंच्या वाढदिवशी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा...! त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो...! हीच या वाढदिवशी प्रार्थना...!

लेखक - प्रा. रविकांत वरारकर
जनता महाविद्यालय, चंद्रपूर
 Mob. : 9975212721