चंद्रपूर सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुलांचा सहभाग असणाऱ्या व्हीडीओची ( चित्रफीत ) स्पर्धा जिल्हा प्रशासनाने आयोजित केली आहे. कोरोना विषयक दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने काळजी घ्यावी व कोरोना नियंत्रण व्हावे, यासाठी प्रशासनाने जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे.आत्मभान अभियानांतर्गत मुलांसाठी ही व्हिडिओ स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेचे दिवस वाढविण्यात आले असून 15 जून ते 18 जून पर्यंत या स्पर्धेमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
अशी असणार व्हिडिओ स्पर्धा :
कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती विषयक विविध व्हिडिओ तयार करून जिल्हा प्रशासनाच्या 9356774681 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. हा व्हिडिओ पाठवताना व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे नाव, वय आणि मोबाईल क्रमांकासह व्हाट्सअप करायचा आहे. साधारणत: हाताची स्वच्छता, मास्क लावणे, शारिरीक अंतर, बाहेरगावावरून आल्यानंतर माहिती देणे, प्रशासनाच्या सूचना पाळणे, बाहेर गेल्यावर काळजी घेणे, बाजारात गर्दी न करणे अशा अनेक विषयावर 1 ते 2 मिनिटांचा व्हिडीओ असावा.दोन मिनिटांपेक्षा अधिक नसावा.
या स्पर्धेमध्ये 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 17 वर्ष या वयोगटातील मुलांना कोरोना विषयक जनजागृती समजावी यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात यावा. स्वतः व इतरांना कोरोना विषाणू पासून सतत सावध राहण्याचा बोध यातून स्पष्ट करावा.या तीन वयोगटातील मुलांना सहभागी होता येणार आहे. याच वयोगटातील मुलांवर शूट करण्यात आलेले व्हीडीओ असावेत.आलेल्या व्हिडीओमधून तीन व्हिडिओची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहेत.