ब्रेकिंग : 1 जुलै पासून शाळा सुरु??? 15 जून च्या शासन परिपत्रकामुळे शिक्षकांत संभ्रम : याच परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : #education-during-lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : 1 जुलै पासून शाळा सुरु??? 15 जून च्या शासन परिपत्रकामुळे शिक्षकांत संभ्रम : याच परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : #education-during-lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शैक्षणिक -

लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता आहे. असे असतानाही शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या पत्रकामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांविना शाळा सुरु असताना शिक्षकांनी शाळेत कोणत्या वेळी उपस्थित राहायचे, यावर शिक्षण विभागाने पत्र काढले नसल्याने या गोंधळात आणखीच भर पडली आहे.

कोरोनामुळे यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शाळांना सुट्या जाहीर झाल्या. त्यानंतर परीक्षा न होताच विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा लागले. हे सर्व झाले असताना आता शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनस्तरावर विविध परिपत्रक काढले जात आहे. १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून ९ ते १० व्या वर्गांची, १ ऑगस्टपासून ६ ते ८, १ सप्टेंबरपासून ३ ते पाचव्या वर्गाची शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने पत्रक काढले आहे. 

यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीला विशेषाधिकारही देण्यात आले. यानुसार शाळा व्यवस्थापन समिती ठरविणार त्यानुसार शाळा सुरु करण्यासंदर्भात या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार काही शाळा व्यवस्थापन समितीने गावात कोरोनाचा प्रादूर्भाव नाही, अशा गावांत शाळा सुरु करण्यासंदर्भात ठराव घेतला. यासंदर्भात समितीने ठरविल्यानुसार त्या-त्या वर्गांची तारीखही निश्चित केली. 

यानंतर २७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र काढून १५ जूनच्या शासननिर्णयानुसार शाळा सुरु करण्याबाबत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ज्या शाळा निर्णयाचे पालन करणार नाही, तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भात तक्रार आल्यास मुख्याध्यापक, शाळाव्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. 

यामुळे शाळा व्यवस्थापन समितीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. आम्हच्या गावात कोरोनाचे रुग्ण नाही. त्यातच शासनाच्या अर्टी, शर्तीचे पालन करून शाळा सुरु करण्यासाठी काय हरकत आहे, असा प्रश्न शाळा सुरु करण्यासंदर्भात ठराव घेतलेल्या समिती उपस्थित करीत आहेत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाचे तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्नही या समितीतील सदस्य उपस्थित करीत आहेत.

सध्या शेती हंगामाचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतात जातात. तर त्यांचे पाल्य दिवसभर गावात इकडे-तिकडे फिरत असतात. अशावेळी काही अनुचित घटनाही घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना घरी न ठेवता शाळेत पाठवून दिवसभरासाठी सुरुक्षित ठेवू इच्छीतो.

त्यामुळे शासनाने गावातील शाळा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केल्यास शेतकरी, शेतमजूर पालकांची समस्या सुटू शकते. हाही विचार काही शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण शाळा लवकर सुरु कराव्या, अशी मागणीही केली जात आहे.


शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकामध्ये महिला शिक्षकांना शाळेत येण्यासंदर्भात मुभा देण्यात आली आहे. त्यातच ज्या शिक्षकांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांनाही वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. तर ज्या शिक्षकांना मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार असे आजार आहे. त्यांनाही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकारातीलच ज्या शाळांत शिक्षक आहे. त्या शाळांचे काय, तसेच ज्या शाळांत केवळ शिक्षिका आहे त्या शाळा सुरू कशा राहतील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात शासनाने पत्र काढले आहे. यामध्ये काही नियमही आहे. मात्र विद्यार्थ्यांविना शाळा सुरु असताना शिक्षकांनी नेमके कितीवेळ शाळेत उपस्थित राहायचे, यासंदर्भात उल्लेख नसल्यामुळे काही शिक्षक केवळ स्वाक्षरी करून मोकळे होत आहे तर काही प्रामाणिक शिक्षक सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेत हजर राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे.


लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणावरही भर दिला जात आहे. यामध्ये शहरी विद्यार्थी काही प्रमाणात सहभाग घेत अभ्यास करणे सुरु केले आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे अ‍ॅन्ड्राईड फोन नाही, काहींकडे आहे तिथे नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे आम्हच्या पाल्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.