आता शहराची सुरक्षा , तुमच्या हातात #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता शहराची सुरक्षा , तुमच्या हातात #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मनपा चंद्रपूर तर्फे जाहीर -

सर्वप्रथम चंद्रपूर शहरातील सर्व नागरिक आणि व्यापारी बंधु भगिनींचे जवळपास दीड महीना लॉकडाउन काळात केलेल्या सहकार्याबद्दल महानगरपालिका चंद्रपूर च्या वतीने
खुप खुप धन्यवाद..! या दरम्यान आपण सर्वांनी अतिशय संयमाने प्रशासनाला साथ देत शहराला कोरोना प्रादुर्भावापासुन दूर ठेवले आहे.
 
सोमवार दिनांक 11 मे, पासून शहरातील व्यापारी  दुकाने काही अटी , शर्तीसह चालु करण्यास मा.जिल्हाधिकारी यांनी  परवानगी दिली आहे, निश्चितच या निर्णयाची सम्पूर्ण चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. 

ही बाब जरी स्वागतयोग्य असली तरी याचा अर्थ असा मुळीच नाही की चंद्रपुर जिल्हा किंवा चंद्रपूर शहराला कोरोनाचा धोका आता नाही आणि आपण सर्व सुरक्षित आहोत उलट आता आपणाला अधिक सावध आणि दक्ष रहाणे आवश्यक आहे. गेल्या दीड महिन्यात विविध माध्यमातून शासनाने कोरोना पासून स्वतःचा बचाव कसा करावा याचे सक्तीचे प्रशिक्षण लॉकडाउन  करुन दिले आहे.

आतापर्यन्त शासनाने त्यांची भूमिका पार पाडली आहे आता वेळ आहे नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडुन प्रशासनाला सहकार्य करण्याची , यापुढे कोरोना पासून  स्वतःचा बचाव तुम्हाला स्वतःच करायचा आहे .
     
गेल्या दीड महिन्यात लॉकडाउन बाबत बहुतांश नागरीक सहकार्य करीत होते, परंतु काही नागरीक केवळ महानगर पालिकेचे पथक येते आणि दंड करते म्हणून नियम पाळायचे गाड़ी दिसली की मास्क घालायाचा नंतर काढून टाकायचा.

ही स्वतःची फसवणूक करणे सोडून आता शासनाने सांगीतलेले नियम हे माझ्या स्वतःच्या,समाजाच्या आणि देशातील बांधवांच्या जीवनरक्षणा साठी आहेत हे समजणे गरजेचे आहे.

जर आपले चंद्रपूर शहर कोरोनापासुन सुरक्षित ठेवायचे असेल तर खालील बाबी प्रत्येक नागरिकाने पाळणे आणि प्रत्येकाला पालन करावयास लावणे  गरजेचे आहे, जर कोणी पालन करत नसेल तर त्यास तसे करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास दुकानदार यांनी साहित्य न देणे अश्या व्यक्तिकडून साहित्य खरेदी न करणे, अशा माध्यमातून  सामाजिक दबाव निर्माण ( Social Pressure) करणेआवश्यक आहे.

शासन प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी उपस्थित राहु शकत नाही, परंतु प्रत्येक नागरिक जागरुक असल्यास नक्कीच गैरजबाबदार नागरिकास आपले वर्तन सुधारावे लागेल.

येथून पुढे कोरोना आजार देशातून नष्ट होईपर्यंत पुढील बाबीचे पालन प्रत्येकास करने आवश्यक आहे.

1) प्रत्येक व्यक्तिने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे.

2)बाहेर कुठेही हाताचा स्पर्श होऊ न देणे, झाल्यास लगेच हात धुणे किंवा स्यानिटायझर  वापरणे.

3) गर्दीच्या ठिकाणी न जाणे , गर्दी असल्यास तेथून साहित्य खरेदी टाळणे.

4)ज्या वस्तु घरबसल्या मिळू शकतात त्या वस्तु घ्यायला बाहेर न निघणे . उदा. भाजीपाला , फळे दारावर विक्री करणाऱ्या फेरिवाल्यांकडून घेणे.

5)आठवडयातून एकदाच साहित्य खरेदी करीता बाहेर निघा आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या.

6) कामावर किंवा कामावरुन परततांना सरळ घरी जा, दररोज बाहेर निघता म्हणून रोज मार्केट मधून खरेदी करायची असे करू नका.

7) दुकानदार असाल तर सुरक्षित ग्राहक  ( मास्क घेतलेल्या आणि सोशल डिस्टनसिंग चे पालन करणारे )यांनाच मालाची विक्री करा , असुरक्षित ग्राहक हा तुम्हाला कोरोना ग्रस्त करू शकतो,हे महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा..!

जान है तो जहान( दुकान) है....!!

8) प्रत्येक दुकानदार यांनी दुकानातील प्रत्येकाला मास्क वापरणे , हैंड सॅनीटायजर / हैंड वॉश ची सुविधा करणे.

9) जर एखाद्या व्यक्तिस ताप असेल तर त्याला दवाखान्यात पाठवावे , आणि बरा होईपर्यंत आराम करावयास लावावे.

10) बाहेरच्या जिल्हा, राज्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तिने 14 दिवस गृह विलागिकरण (होम क्वारेंटाईन)  चे कठोर पालन करणे.

11) बाहेरच्या जिल्हा,राज्यात वाहतूक करणाऱ्या ड्रायवर , क्लीनर , कंडक्टर यांनी घरी न जाणे , ट्रांसपोर्टर यांनी तयार केलेल्या विश्राम गृह येथे राहणे. 

12) सार्वजनिक ठिकाणी न थूंकणे 

13) सलून अथवा ब्युटी पार्लर मध्ये जाताना स्वतःचा नॅपकिन/टॉवेल अवश्य न्या. कोणत्याही परिस्थितीत सलून /ब्युटी पार्लर मधील नॅपकिन वापरू नका. तुम्ही आणि सेवा देणारे दोघांनीही मास्क लावण्याची दक्षता घ्या.

 या तेरा  बाबी आपल्या शहराला सुरक्षित ठेवू शकतात ...!

अब तुम्हारे हवाले शहर साथियो....!!!

सौ. राखी कंचर्लावार, महापौर, मनपा, चंद्रपूर. 

श्री. राजेश मोहिते, आयुक्त, मनपा, चंद्रपूर