हाडाचा माणूस ! मोडलेल्या, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या रुग्नांचे देवदूत #giridhar_kale - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हाडाचा माणूस ! मोडलेल्या, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या रुग्नांचे देवदूत #giridhar_kale

Share This
📍 प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे यांच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख...

◾️हाडाचा माणूस !
◾️मोडलेल्या, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या रुग्नांचे देवदूत
◾️34 वर्षांपासून निःशुल्क व निस्वार्थ सेवा करणारा कर्मयोगी
◾️चार लाखांहून अधिक अस्थिरुग्नांवर यशस्वी उपचार
◾️ग्रामसभेने 'डाॅक्टर' ही उपाधी दिलेला देशातील पहिलाच कार्यकर्ता !
◾️आज वाढदिवसानिमित्त कोरपना येथे भव्य रक्तदान शिबीर

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

हाडाचा माणूस !

समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामान्यातला असामान्य माणूस. तळागाळातल्या लोकांचा हक्काचा डॉक्टर. चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी या छोट्याशा गावात मागील ३४ वर्षापासून मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या, फॅक्चर झालेल्या हाडांच्या रुग्णांवर ते निःशुल्क उपचार करत आहे. आजतागायत चार लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी नैसर्गिक पद्धतीने उपचार करून बरे केले. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले काळे यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे ग्रामसभेने 'डॉक्टर' ही ऐतिहासिक उपाधी दिली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून रोज शेकडो अस्थिरुग्णांवर उपचार करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांचा आज १ जून रोजी सुवर्ण महोत्सवी सोहळा. यानिमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाचा हा आढावा..

जो दुसऱ्याशी उत्तम करितो |
त्यातचि आनंद मानतो |
तोच सेवक मी समजतो |
येत्या युगाचा ||

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख अगदी तंतोतंत करून दिली आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात जो तो स्वार्थासाठी झटत असताना निस्वार्थपणे काम करणारे काही मोजके लोक अपवादाने पाहायला मिळतात. खरेतर हा समाज सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानावरच टिकून आहे. महाराष्ट्राला सामाजिक कार्यकर्त्याची संस्कृती आहे. कर्मयोगी बाबा आमटेंच्या भुमीत पूर्व विदर्भात सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात डॉ.गिरीधर काळे या समाजसेवकाचे नाव पुढे येते. समाजात अशी काही माणसं असतात की ज्यांना कधी प्रसिद्धीची गरज पडली नाही. ते नियमीत समाजासाठी आयुष्य अर्पण करून झटत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बिबी या छोट्याशा गावातील गिरीधर काळे या सामाजिक कार्यकर्त्यांची ही अशीच गोष्ट !

पूर्वी गावागावात वैद्य असायचे. गावातच नैसर्गिक उपचार करून लोकांना बरे करायचे. त्यांच्या ज्ञानाला खरोखरच तोड नसायची. आजही अशी काही मंडळी गावगाड्यात काम करत आहेत. फरक एवढाच की त्यांची फारशी दखल होत नाही. गिरीधर काळे यांचे आजोबा स्व.बळीराम पावडे हे त्यातीलच एक. मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या हाडाच्या रुग्णावर ते उपचार करुन बरे करायचे. त्यांच्या मृत्यूनंतर वयाच्या सोळाव्या वर्षापासून तर आजतागायत गिरीधर काळे त्यांचा वारसा चालवत आहे. 

मानवी शरीरातील परिसरात कुणाचेही हात-पाय मोडले तर हमखास लोक समाजसेवक गिरीधर काळे यांचे बिबी येथील घर गाठतात. त्यांचे हात चक्क एक्स-रे सारखे रुग्णांची तपासणी करतात. हाड मोडलेले आहे की फ्रॅक्चर आहे हे हात लावताच ते ठामपणे सांगतात व लगेच तिळाचे तेल लावून मालिश करून व्यवस्थित जोडून देतात. त्यांच्या उपचार पद्धतीने रुग्णांची तुटलेले हाड महिनाभरातच नैसर्गिक पद्धतीने जुळते. तज्ञ डॉक्टरांकडे हाडाच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र गिरीधर काळे यांच्याकडे सर्वसामान्य माणसांचा लाख रुपयांचा खर्च वाचतो. त्यांच्या या अतुलनीय सेवेमुळे जनमानसात ते 'लोकांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध आहे.

त्यांच्या बिबी येथील 'माऊली' या निवासस्थानात रोज शेकडो लोकांची गर्दी असते. त्यांच्या मानवीय सेवेमुळे गावाचे नाव विदर्भ राज्यात सर्वदूर 'सेवेची पंढरी' म्हणून प्रख्यात आहे. पुणे-मुंबईसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातून रोज शेकडो हाडाचे रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. २४ तास ते सेवेसाठी तत्पर असतात. हे सगळं करताना ते लोकांकडून एक रुपयाही घेत नाही. निस्वार्थ सेवेमुळे या हाडाच्या माणसाची ओळख सर्वसामान्य माणसात 'देवदूत' म्हणून झाली आहे.

समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांचा जन्म १ जून १९७० रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा मूळ व्यवसाय शेती. तीस एकर शेती आधुनिक पद्धतीने ते स्वतः कसतात. एक असामान्य माणूस सर्वसामान्य माणसात 'माणूस' म्हणून मिसळतो. समाजाला जितके देता येईल तितके देण्याचा प्रयत्न करतो. ते सकाळी ८ ते २ या वेळात पूर्णपणे अस्थिरुग्णांवर उपचार करून सेवा करतात. हे सगळं करताना त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील राहत नाही. दूरवरून येणाऱ्या रुग्णांवर ममतेने बोलून समतेने उपचार करतात. उर्वरित दुपारचा वेळ शेतीकामात घालवतात. परत सायंकाळी ६ ते ९ या वेळात आलेल्या अस्थिरुग्णांवर उपचार करतात. रात्री-बेरात्री कुठे अपघात झाला, कुणाचे हात-पाय मोडले, फॅक्चर झाले तर गिरिधर भाऊंच्या घरी रुग्ण येतात. तेव्हा कुठलाही त्रास न करता हा माणूस उपचार करतो. आजच्या धकाधकीच्या काळात अशी निस्वार्थपणे इतके वर्षे लोकांची सेवा करणे अवघड असून काळे यांची मानवसेवा थक्क करणारी व समाजाला प्रेरणा देणारी आहे.

मागील पाच वर्षापासून त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची नोंदवही गावातील तरुणांनी केली. त्यात महिनाभरात ते अठ्ठाविसशे ते तीन हजाराच्या वर रुग्णांवर उपचार करत असल्याचे दिसून आले. हे सगळं करताना त्यांच्या चेहर्‍यावर कधीही थकवा जाणवत नाही. कंटाळा व आळस करत नाही. 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' माणून हा हाडाचा माणूस हाडाच्या रुग्णांसाठी कर्मयोगी म्हणून काम करतो आहे. समाजात अनेक स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजणारे आहेत. छटाकभर काम करून किलोभर सांगणारे कमी नाहीत. अशावेळी सतत ३४ वर्षे तळागाळातल्या रुग्णांची निशुल्क व निस्वार्थ सेवा करणारा हा माणूस दुर्मिळ आहे. त्यांच्या अस्थिरुग्णांची वैद्यकीय सेवा पाहता चंद्रपुरातील अस्थितज्ञ डॉक्टरांनी गलेलठ्ठ पगारावर आपल्या दवाखान्यात काम करण्याची विनंतीही केली होती. मात्र गिरीधर काळे यांनी नकार देऊन सर्वसामान्य माणसांसाठी मोफत सेवा देण्याचे व्रत सोडले नाही. 


समाजसेवेचा हा सेवाव्रती फक्त सामाजिक कामापुरताच मर्यादित नाही तर आपल्या असामान्य कर्तृत्वातून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ते उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. भजन मंडळाच्या माध्यमाने परिसरात ते जनजागृती करतात. मागील वर्षी बिबी येथे राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. परिसरात होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक उपक्रमात ते सक्रिय असतात. गावगाड्यातील संस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्यात ते अजूनही कार्यतत्पर आहेत. गावात व परिसरात सलोख्याचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ते उभे असतात. कार्यकर्ते गिरीधर काळे हे इतकी अफाट सेवा करूनही कधीही मंचावर बोलत नाही. स्वतःला मिरवत नाही. सर्वसामान्य माणसांना पुढे करून समाजाच्या कामी यावे यासाठी ते धडपडतात. सर्वधर्मसमभावाचे तत्व जोपासतात. सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काय काय करता येईल या विचारात हे खपत असतात. 

मेरे प्रभो !
मुझे इतनी उॅचाई कभी मत देना
गैरोंको गले ना लगा सकू
इतनी रुकाई कभी मत देना ||

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या या ओळी म्हणजे या कार्यकर्त्याचा जगणं. समाजसेवेचा हा भुकेला कर्मयोगी. त्यांच्या लोकसभेची दखल विविध सामाजिक संघटनांनी घेतली. अनेक पुरस्कार दिले. मात्र मोठ्या स्तरावर शासनाने दखल घेतली नाही. त्यांना ती गरजही वाटली नाही. ते अजूनही आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत. 'आयुष्याच्या अंतापर्यंत अस्थिरुग्णांच्या हाडांवर उपचार करून त्यांना बरे करण्यातच मी आनंद शोधतो', असे त्यांचे मत आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्या मंडळीकडून दरवर्षी त्यांच्या नावाने विविध सामाजिक उपक्रम परिसरात राबवले जातात. 

समाजसेवक गिरधर काळे यांच्या नावाने राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मानाचा 'जीवनगौरव पुरस्कार' सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला जातो. परिसरात दरवर्षी गुणवंताचा सत्कार सोहळा, वृक्षारोपण, व्याख्याने, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांची मानवी सेवा ही निश्चितच 'पद्मश्री'च्या पलीकडची आहे. 

मात्र जी माणसे प्रामाणिकपणे गावगाड्यात काम करत असतात, ज्यांना कधी प्रसिद्धीची गरज पडली नाही, अशा माणसांची दखल घेण्यात शासन अपयशी पडतं, हे निश्चितच कटूसत्य आहे. आजच्या जगात कुणीही दिवसभर कोणाची मोफत सेवा करू शकत नाही, या काळात गिरीधर काळे रोज दिवसाचे आठ ते दहा तास अस्थिरुग्णांवर तीन तपे मोफत उपचार करून त्यांची सेवा करतात. त्यांना बरे करतात. हे अलौकीक आहे.
 

खरेतर त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपचार पद्धतीवर संशोधन होणे गरजेचे आहे. समाजातील जाणत्या लोकांकडून दखल होणे गरजेचे आहे. तळागाळातल्या लोकांच्या दुखण्यावर परिसरात 'गिरिधर काळे' नावाचं औषध सर्वसामान्य माणसांच्या ओठावर आहे. खूप दिवसाचे कंबरेचे दुखणे असो, हाता-पायाचे दुखणे असो, खांद्याचे सरकलेले हाड असो, अशा कित्येक दुखण्यावर त्यांनी यशस्वी उपचार केले. सर्वसामान्य गरीब लोकांसाठी ते खरोखरच देवदूत ठरले आहे. अशा असामान्य माणसांना जोपासणे, त्यांचं कर्तृत्व स्विकारणे ही काळाची गरज आहे.

ग्रामसभेने 'डॉक्टर' उपाधी दिलेला देशातील पहिला कार्यकर्ता !

मागील तीन तपापासून अस्थिरुग्णांची सेवा करणा-या या समाज सेवकाने बिबी गावाला राज्यभरात ओळख दिली. त्यांची वैद्यकीय सेवा समाजाला सतत प्रेरणादायी ठरत आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत असले तरी त्यांची सेवा अस्थितज्ञापुढे आहे. अस्थितज्ञ डॉक्टर देखील त्यांच्या सेवेला सलाम ठोकतात. ते सातत्याने सेवा करत असल्याने लोक गिरिधर काळे यांना 'डॉक्टर' म्हणूनच हाक मारायचे. बिबी ग्रामसभेने दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी प्रजासत्ताक दिनी त्यांना 'डॉक्टर' ही उपाधी देण्याचा ठराव मांडला. 

सर्वानुमते गावकऱ्यांनी त्यांना डॉक्टर ही उपाधी ग्रामसभेतून दिली. देशातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय ठरला. गिरीधर काळे हे ग्रामसभेने उपाधी दिलेले पहिले 'डॉक्टर' ठरले. खरेतर या सामाजिक कार्यकर्त्यांची एखाद्या विद्यापीठाने दखल घेऊन त्यांना गौरवायला हवे. मात्र एका विद्यापीठाची जबाबदारी गावाने पार पडली आणि गिरीधर काळे दहावी शिकलेला हाडाचा माणूस सर्वसामान्य लोकांचा 'डॉक्टर' झाला. आज काळे यांना लोक हक्काने 'हाडाचे डॉक्टर' म्हणूनच हाक मारतात.

-अविनाश पोईनकर
बिबी, चंद्रपूर
मो.७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

(लेखक साहित्याचे अभ्यासक व ग्रामीण विकास चळवळीतील कार्यकर्ते आहे.)
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱