कोरोनासारख्या अन्य कोणत्याही महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करा : ना. विजय वडेट्टीवार #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोनासारख्या अन्य कोणत्याही महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करा : ना. विजय वडेट्टीवार #diochandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि.13 मे : 

कोरोना साथीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यामध्ये लवकरच प्रयोगशाळा उभी होत आहे. याशिवाय कोणत्याही गंभीर आजारावर ईलाज होईल, अशी बळकट आरोग्य यंत्रणा जिल्ह्यामध्ये उभी करावी. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

ना. वडेट्टीवार यांनी आज जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी राजुरा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर शहर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कोरोना मुक्त राहील यासाठी संपूर्ण जिल्हा यंत्रणा अतिशय प्रभावीपणे काम करीत आहे.मात्र ही वेळ आरोग्य यंत्रणा देखील बळकट करण्याची असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व यंत्रसामुग्री यंत्रणा बळकट करावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये नागपूर व अकोला येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळेनंतर नवीन प्रयोगशाळा उभी होत आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्फत अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

या प्रयोगशाळेची पायाभूत सुविधा निर्माण झाली आहे. तथापि,यंत्र विदेशातून येत असल्यामुळे सध्या त्याठिकाणी तपासणी सुरू व्हायची आहे. ही तपासणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.कोविड-19 संदर्भात आवश्यक उपाययोजना करताना भविष्यात भासणारा व्हेंटिलेटरचा तुटवडा, तसेच आवश्यक अशा विलगीकरण कक्षासंदर्भातही उपाययोजना करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्याची मोठी मोहीम सुरू झाली आहे. यासाठी महसूल विभाग पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. यावेळी त्यांनी तालुकानिहाय पदांच्या कमतरते बाबतही आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. पदभरती करताना जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांची उपलब्धता योग्य प्रमाणात व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, यांनी देखील कर्मचाऱ्यांची उपलब्धता होण्याबाबत पालकमंत्र्यांकडे आग्रह धरला.
       
या बैठकीमध्ये अन्नधान्य वितरणाच्या संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनाही पाचारण करण्यात आले. दर महिन्यांचा नियोजीत वितरण कोटा योग्यप्रकारे लोकांपर्यंत पोहचविला जात आहे. तसेच स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यांमध्ये परत जात आहे. त्यामुळे आता नव्याने आवश्यक अन्नधान्याच्या कीट वाटपाला तूर्तास स्थगिती द्यावी, असा निर्णय घेण्यात आला.

तथापि, नियमित अन्नधान्य वाटप मात्र व्हावे, असेही स्पष्ट करण्यात आले.यावेळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ उत्पादन होत असून यासाठी त्याचा देखील वापर व्हावा. तसेच या परिसरात तांदूळ वितरण करताना अन्य राज्यातील तांदूळ वाटप न करता स्थानिक स्तरावरील साठा वापरावा, असेही निर्देश देण्यात आले.

अन्य राज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात जात असल्यामुळे जिल्ह्यातील विविध आस्थापनांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी पुढील आठवड्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. तसेच या ठिकाणी निर्माण होणाऱ्या जागा व त्यासाठी आवश्यक कुशल-अकुशल कर्मचाऱ्यांची व्यवस्था याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धान उत्पादक व कापूस उत्पादक प्रदेश असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कॉटन टू फॅशन, तसेच कॉटन क्लस्टरच्या विकासासंदर्भात आपण स्वतः आग्रही असून या संदर्भातील काही मोठे प्रोजेक्ट याभागात लागावे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी अन्नधान्य वितरणाची व्यवस्था आणखी बळकट करण्याबाबत तसेच कापूस उत्पादक जनतेला सीसीआय मार्फत सुरू असणाऱ्या कापूस खरेदी भावाने दर मिळावे,अशी मागणी केली.

यावेळी किशोर जोरगेवार यांनी देखील कापूस उत्पादकांना बेभाव विक्री करावी लागू नये यासाठी ग्रेडर यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच खाजगी जीनिंग क्षेत्रावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या सर्व प्रश्नांवर योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले.