अवैध दारुव्यावसायिकांनी माणिकगडवर विणले जाळे नांदेड यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पुरवठा करणारे नेटवर्क; पोलीस प्रशासन अनभीज्ञ? #darubandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध दारुव्यावसायिकांनी माणिकगडवर विणले जाळे नांदेड यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पुरवठा करणारे नेटवर्क; पोलीस प्रशासन अनभीज्ञ? #darubandi

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर,जिवती - दिनांक 18 - 

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने सारे जग लॉडाऊनमध्ये अडकलेले असताना, काही दारू व्यावसायिकांनी मात्र या संधीचा फायदा घेत जिवती तालुक्यातील दुर्गम भागात आपले पाय पसरविले असून, येथिल डोंगरकपारीत अवैधरित्या दारू काढण्याचे आणि चंद्रपूर जिल्ह्यासह नांदेड यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पुरवठा करण्याचे नेटवर्क तयार केले आहे.
 
माणिकगड पहाडावर वास्तव्य करून राहणा-या आदिम जमातीच्या लोकांच्या अज्ञानाचा व गरीबीचा गैरफायदा घेत त्यांना धाक, आमिष दाखवून हे गैरकृत्य बेधडकपणे चालू असल्याची माहीती आहे. याबाबत पोलीस प्रशासन मात्र गाफिल असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका म्हणजे अती मागास व दुर्लक्षीत राहीलेला भूभाग असून, या तालुक्याला तेलंगणा राज्याची सिमा लागलेली आहे. याशिवाय येथून नांदेड व यवतमाळ जिल्ह्यापर्यंत जाण्याचे मार्गही प्रशस्त आहेत.

या तालुक्यातील अनेक गावे आडवळणावर, मुख्य रस्त्यापासून लांब असून, अशा दुर्गम गावापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे साधनही उपलब्ध नसल्याने सहसा कुणाचीही वर्दळ येथे नसते. विशेष बाब म्हणजे येथिल आदिवासीकडे जंगलातून जमा केलेले मोहफुल सहज उपलब्ध होत असल्याने ही परिस्थिती दारूव्यावसायिकांसाठी अतिशय पोषक ठरू लागली आहे. आदिवासी गावालगत वाहणारे नाले आणि डोंगराळ भागाचा आसरा घेत या व्यावसायिकांनी दारू काढण्याचा आपला व्यवसाय थाटला असल्याची माहीती सुनांना दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये तेलंगणा राज्यातील सिमेवर कडक बंदोबस्त असल्याने तेलंगणा राज्यातून गैरमार्गाने येणा-या दारूवर चांगलाच चाप बसला आहे. याचा फटका येथिल दारुव्यावसायिकांना बसला. याला पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी आता आपला मोर्चा अती दुर्गम भागातील आदिवासी गावाकडे वळविला असून, जिवती तालुक्यातील अतीदुर्गम अशा आदिवासी वस्त्यांची निवड करून या ठिकाणी दारू काढण्याचे गैरकायदेशीर उद्योग सुरु केले असल्याचे दिसून येते. 

स्थानिक आदिवासीना मोहपाशात अडकवून व प्रसंगी त्यांना धमकावून आपल्या व्यवसायाचे पाळेमुळे येथे रुजविली असल्याची माहीती येथील नागरीकांनी दिली आहे. या व्यावसायिकांच्या भितीने येथील आदिवासी बांधव चांगलेच धास्तावले असून, त्यांच्या विरुध्द बोलण्यासही ते धजावत नसल्याचे पहावयास मिळते.

रोज मध्यरात्रीनंतर मोटरसायकलवरून आणि कारमधूनही प्लास्टिकच्या कॅनच्या सहाय्याने सर्रासपणे या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, एक मोटर सायकल काही अंतरापर्यंतचा प्रवास केल्यानंतर त्याच्याकडील कॅन दुस-याच्या स्वाधिन केली जाते. व तो पुन्हा काही अंतरापर्यंत त्या कॅनची वाहतूक करतो. अशा नेटवर्कच्या सहाय्याने ही दारू दुस-या जिल्ह्यापर्यंत पाठविली जात आहे. यासाठी सहसा आडवळणाचा वापर केला जात असल्याची माहीतीही सुत्रांनी दिली. जिवती या तालुक्याच्या ठिकाणापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कलीगुडा व खडकी या कोलामगुड्याजवळही अशाप्रकारची दारू काढून अन्य भागात पाठविली जात असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

कोलामगुड्यालगतचे गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही - विकास कुंभारे, अध्यक्ष, कोलाम विकास फाऊंडेशन.

माणिकगड पहाडावरील आदिम कोलाम विकासापासून लांब असून, या लोकांच्या अज्ञानाचा व गरीबीचा गैरफायदा घेत काही मंडळी अवैध दारू व्यवसाय करीत असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब अतीशय निदनीय व संतापजनक आहे. असे गैरकृत्य करणारी मंडळी कोलामांना किवा अन्य आदिवासीना आमिष दाखवून किवा त्यांना चिथावणी देऊन गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोलामगुड्यालगत चालणारे हे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही.त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने हद्दपार केले पाहीजे.