मोहफुले वेचण्यास गेलेल्या इसमाची हत्या #naxal - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोहफुले वेचण्यास गेलेल्या इसमाची हत्या #naxal

Share This


खबरकट्टा /गडचिरोली -कोरची- 

मोहफुले वेचण्यास पत्नीसह शेतशिवारात गेलेल्या इसमाची नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता कोरची तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत कोहका-मोकासा गावाजवळ घडली असून जिवता गणपत रामटेके(४५) रा.कोटगूल असे मृत इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार कोरची तालुक्यातील कोटगुल येथील जिवता रामटेके हा पत्नी नीलम हिच्यासह आज पहाटे कोहका-मोकासा येथील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. तेथे एक नक्षल महिला मोहफुले वेचत होती. तिने जिवता रामटेची पत्नी नीलम हिला तिच्या पतीचे नाव विचारले. काही क्षणातच दोन नक्षलवादी तेथे आले. त्यांनी नीलमला पकडून ठेवले आणि दुसऱ्या नक्षल्यांनी जिवताला दोनशे मीटर अंतरावर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच नीलमने कोटगूल हे गाव गाठून तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. 
जिवताला कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यास कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच जिवता रामटेकेंनी प्राण सोडला.

जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मनिषा नामक मुलीचे लग्न नियोजित होते. यामुळे रामटेके कुटुंबावर आघात झाला आहे.  घटनेचा तपास कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली  कोटगुल पोलिस मदत केंद्राचे अधिकारी राऊत करीत आहेत. चालू आठवड्यात नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केलेली ही दुसरी हत्या आहे. यामुळे तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.

नक्षल्यांनी पुलाच्या कामावरील वाहने जाळली :

नक्षल्यांनी आज ८ एप्रिलच्या पहाटे अहेरी तालुक्यात दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या कामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केली. कमलापूर-लिंगमपल्ली मार्गावर पुलाचे काम सुरु आहे. या कामावरील २ ट्रॅक्टर व २ मिक्सर मशिनची नक्षल्यांनी जाळपोळ केली. अशीच जाळपोळ जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरील किष्टापूर नाल्याजवळ केली आहे. तेथेसुद्धा नक्षल्यांनी ट्रॅक्टर, मिक्सर मशिन व जनरेटरची जाळपोळ केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.