मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नावाने राजकीय स्वार्थासाठी सर्रासपणे भोजन वाटप :नगरसेवक पप्पू देशमुख यांनी भोजन वाटप घोटाळ्याचा केला पर्दाफाश : मनपाच्या निधीचा राजकीय फायद्यासाठी दुरूपयोग जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व मनपा आयुक्त मोहिते यांचेकडे तक्रार दाखल #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नावाने राजकीय स्वार्थासाठी सर्रासपणे भोजन वाटप :नगरसेवक पप्पू देशमुख यांनी भोजन वाटप घोटाळ्याचा केला पर्दाफाश : मनपाच्या निधीचा राजकीय फायद्यासाठी दुरूपयोग जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व मनपा आयुक्त मोहिते यांचेकडे तक्रार दाखल #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

कोरोना संक्रमणाच्या आपत्तीमध्ये अनेक मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा गरजू लोकांना भोजन वाटप करण्याचा समाजपयोगी उपक्रम चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे मागील पंधरा दिवसांपासून राबविण्यात येत आहे.प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून गरजू लोकांना भोजनाचे डबे  पोहोचविण्यात येतात. प्रथम मनपाच्या तीनही झोनमध्ये डब्याचे समान वाटप करण्यात येते.

त्यानंतर प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून हे डबे गरजू पर्यंत पोहोचण्यात येतात.सुरुवातीला महानगरातील काही स्वयंसेवी संस्थांनी मनपाला डबे पुरवले. परंतु मनपाचे पदाधिकारी स्वतःच्या पक्षाचे लेबल लावून डब्बे वाटप करीत असल्याची बाब स्वयंसेवी संस्थेच्या लक्षात आल्याने त्यांनी डब्बे देणे बंद केले अशी चर्चा आहे.सुरुवातीला स्वयंसेवी संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या डब्यातून प्रत्येक नगरसेवकाला दिवसातून एकदा 40 ते 50 डबे देण्यात येत होते.

त्यानंतर मनपाने एक निविदा प्रक्रिया तातडीने राबवून दररोज दोन वेळ 50 डब्बे व मागील तीन दिवसापासून सत्तर ते शंभर डब्बे प्रत्येक नगरसेवकाला देणे सुरू केले.या निविदा प्रक्रियेबाबत सुद्धा   मौखिक तक्रारी  अनेक नगरसेवकांनी प्रशासनाकडे केलेले आहेत.डब्ब्यांची संख्या गरजू लोकांपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे अनेक नगरसेवकांनी भोजनाचे डबे वाढवून देण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली.

भोजनाच्या डब्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे यापेक्षा जास्त डबे देता येणार नाही असे कारण प्रशासनातर्फे नगरसेवकांना सांगण्यात येत होते.मात्र याबाबत वडगाव प्रभागाचे नगरसेवक जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना एक गुप्त माहिती मिळाली.

मनपाच्या निधीतून तयार होत असलेले हजारो भोजनाचे डबे परस्पर सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी उचलत असून त्याचे वाटप ते जिल्ह्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या व पक्षाच्या नावाखाली करीत असल्याची  माहिती देशमुख यांना मिळाली. नगरसेवक देशमुख यांनी आज 9 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या  सुमारास अचानक आकाशवाणी जवळील वडगाव रोडवरील भोजनाचे कंत्राट मिळालेल्या एका कंत्राटदाराच्या घरी धडक दिली.

त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या एका पक्षाच्या काही चार चाकी वाहनांची व त्यामध्ये टाकण्यात आलेल्या भोजनाच्या डब्याची शूटिंग करून सदर कंत्राटदाराला जाब विचारला असता कंत्राटदाराने संशयास्पद उत्तरे दिली.यावरून  पक्षाच्या नावाखाली केवळ राजकीय हेतूने सर्रासपणे भोजन वाटप करण्यासाठी डबे नेण्यात येत आहेत व याचा खर्च मनपाचे निधीतून करण्यात येणार असल्याचे सिद्ध झाले.

या सर्व गैरप्रकराची तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मनपा आयुक्त मोहिते यांचेकडे केली.संपूर्ण  गैरप्रकाराची चौकशी करून मनपाच्या निधीचा राजकीय फायद्यासाठी दुरूपयोग करणाऱ्या पदाधिकारी यांचेविरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.