महिनाभरात जिल्ह्यात पोहचलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर #diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महिनाभरात जिल्ह्यात पोहचलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर #diochandrapur

Share This
◾️एका महिन्यात 33 हजार नागरिक स्वगृही दाखल
◾️जिल्ह्यात एकही पॉझिटिव नागरिक नाही
◾️आजारी असेल तर तपासणी करा ; धोका पत्करू नका
◾️प्रशासनाच्या आरोग्य तपासणी व चौकशीला प्रतिसाद देण्याचे आवाहन
◾️101 पैकी 88 नमुने निगेटिव्ह; 13 प्रतिक्षेत
◾️132 नागरिक तपासणीसाठी इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये
◾️जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी
◾️मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे
◾️कोटा शहरातील 39 विद्यार्थी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
◾️यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर गस्त वाढवली
◾️महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रमाला अल्प उपस्थिती ठेवा
◾️पोलीसांचे रुट मार्चखबरकट्टा / चंद्रपूर,दि. 29 एप्रिल : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात बाहेर राज्यात, अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षण नोकरी व रोजगारासाठी बाहेर असणाऱ्या जवळपास 33 हजारावर नागरिकांची नोंद गेल्या महिन्याभरात झाली आहे. लॉकडाउननंतर परवानगी घेऊन नागरिक आले आहेत. यापैकी 31 हजार 138 नागरिकांनी 14 दिवसांचा विलगीकरनाचा अर्थात होम कॉरेन्टाइनचा कालावधी पूर्ण केलाय. 2550 नागरिक सध्या हा कालावधी पूर्ण करीत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडूनच धोका असल्याने माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय सक्त असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे ही तपासणी आपल्या स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वतःची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर किंवा हॅलोचांदाच्या टोल फ्री क्रमांक 155-398 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही.अशा कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे संबंधित पोलिस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्य स्थळी रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील 39 विद्यार्थी अडकून पडले आहे. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे.

 नागपूर यवतमाळ हे 2 जिल्हे रेड झोन मध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण आढळले आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या श्रीमान वरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश केल्या जात नाही. नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यासाठी पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला.

जिल्हाभरात सारी व आयएलआयची तपासणी:

कोरोना सोबतच आयएलआय आणि सारी यांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनातर्फे युद्धस्तरावर ॲक्शन प्लॅन राबविली जात आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वस्ती,डेपो, टेकडी, झोनमध्ये नगरपरिषद कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,आरोग्यसेविका तथा विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक करून वार्डनिहाय पथकाचे गठन करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरामध्ये आज घरोघरी जाऊन सर्दी, खोकला,ताप,घसा दुखी, असणाऱ्या तसेच बाहेर देशातून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आले. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची फॉर्म नंबर 8 मध्ये माहिती भरून आरोग्य विभागाकडे पाठवून त्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांना क्वॉरेन्टाईन करण्यात येत आहे. तसेच व्यापारी, दुकानदार, ठोक तसेच चिल्लर भाजी विक्रेते यांची थर्मल स्कॅनरद्वारे टेंपरेचर तपासणी मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांच्या मार्गदर्शनाखाली हि सर्वे मोहीम चालू आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप सुरू:

जिल्ह्यामध्ये एपीएल अर्थात केशरी शिधापत्रिकांची संख्या 47 हजार 373 आहे. जिल्ह्यात 24 एप्रिल पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती 8 रुपये दराने 3 किलो गहू व प्रतिव्यक्ती 12 रुपये दराने 2 किलो तांदूळ वाटप सुरू आहे. आतापर्यंत 748.23 क्विंटल गहू तर 498.07 क्विंटल तांदूळ वाटप झाले आहे. गहू व तांदूळाचे एकूण 1246.30 क्विंटल वाटप झाले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनी आपल्या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी केले आहे.

मुख्यालया बाहेरील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे:

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी  यांना आळीपाळीने (रोटेशन) पद्धतीने कार्यालयात बोलवावे. या शासन निर्णयाप्रमाणे केवळ कार्यालयातील एकूण अधिकारी,कर्मचारी यांना उपस्थित राहण्यापासून सूट अनुज्ञेय होती. जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशान्वये कोविड-19चा प्रभाव रोखण्याकरिता संचारबंदीचे आदेश पारित केले असल्याने अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालय न सोडता मुख्यालयात हजर राहणे अगत्याचे आहे.

जे अधिकारी, कर्मचारी कार्यालय प्रमुखाची किंवा  कार्यालयाची परवानगी न घेता संचारबंदी आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करून मुख्यालय सोडून बाहेरगावी गेलेले आहेत. त्यांनी कलम 188 व 271 भा.दं.वि.व कलम 37 (3) व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच कलम 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे व त्याद्वारे ते शिक्षेस पात्र असून अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सदर कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने खुलासा प्राप्त करावा व त्यांचेवर  नियमानुसार कार्यवाही करावी. असे एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 109 नागरिकांची नोंद करण्यात आली असुन यातील  101 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 88 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 13 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 688 आहे. यापैकी 2 हजार 550 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 31 हजार 138 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 132 आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 292 प्रकरणात एकूण 15 लाख 70 हजार 870 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या  58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 1 हजार 35 वाहने जप्त केली आहेत.प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेले नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.