पुण्याच्या व्यक्तीचा चंद्रपुरात मृत्यू : शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल मृत्यूचे नेमके कारण : कोरोना लक्षणें नाहीत - डॉ. निवृत्ती राठोड #covid -19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुण्याच्या व्यक्तीचा चंद्रपुरात मृत्यू : शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल मृत्यूचे नेमके कारण : कोरोना लक्षणें नाहीत - डॉ. निवृत्ती राठोड #covid -19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


कोरोना विषाणूने जगभरात दहशत माजली असून, पुणे येथून आठ दिवसांपूर्वी (सासरी) चंद्रपुरात आलेल्या 47 वर्षीय इसमाचा शनिवार, 4 एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाल्याने चंद्रपूर महानगरात खळबळ उडाली. मात्र, त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

पुणे येथून येताच त्या व्यक्तीला ‘होम क्कॉरेनटाईन’मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, त्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाही. त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालाअंती कळेल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.

महानगरातील गोपालपुरी वॉर्डातील एका कुटुंबाचा जावई असलेला 47 वर्षीय इसम पुणे येथून चंद्रपुरात आला. तो पत्नी, मुलांच्या भेटीसाठी आला होता. 22 मार्चला जनता संचारबंदी आटोपताच, 23 मार्चला तो चंद्रपुरात आला होता. दरम्यान, संचारबंदी लागू झाल्याने तो येथेच अडकला. चंद्रपुरात येताच लगेच आरोग्य विभागाने त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला ‘घरी राहा’ असा शिक्का मारला. 

वैद्यकीय तपासणीदरम्यान, त्याच्यात कुठलीही कोरोना आजाराची लक्षणे दिसून आली नव्हती. शुक्रवारी रात्री जेवनानंतर तो झोपी गेला. सकाळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यास चहा घेण्यासाठी उठवले असता, तो खाटेवरून उठलाच नाही. घटनेची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. पोलिस व आरोग्य विभागाची चमुने घटनास्थळ गाठले. त्याची तपासणी केली असता, तो मृत्यू पावला होता. पुणे येथून नातेवाईक पोहोचले नसल्यामुळे वृत्त लिहेपर्यंत शविच्छेदन झाले नव्हते.

त्याचा मृत्यू ह्दयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, अशी शक्यता महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजूरकर यांनी व्यक्त केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रूग्णालयात आणला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असेही त्या म्हणाल्या.