कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांना दिवे लावायला सांगणे ही मोठी अंधश्रद्धा असून आपले समर्थक किती आहेत, हे पळताळून पाहण्यासाठी पंतप्रधानांनी लढविलेली ही शक्कल आहे, अशी टीका राज्याचे ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग,भटक्या विमुक्त जाती-जमाती विभाग, तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन करायला खूप उशिर केला. राहुल गांधींनी संसदेत खूप आधी लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हसले होते. परंतु आता राहुल गांधीच्या वक्तव्याकडे लक्ष न दिल्याने देशातील गोरगरीब नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी रात्री ८ वाजता टीव्हीवर येऊन १२ वाजता लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. परिणामी लोकांना सावरासावर करण्यास वेळ मिळाला नाही. अनेक कर्मचारी, मजूर, कामगार, विद्यार्थी ठिकठिकाणी अडकले. आज त्यांची गैरसोय होत आहे. किमान दोन दिवसांचा वेळ दिला असता तर सर्व जण आपापल्या घरी पोहचले असते, असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रंगपंचमी झाल्यावर समयसूचकता दाखवत अंशकालीन लॉकडाऊनची घोषणा केली, त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात राहिली, असे श्री.वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
आता कोरोनाच्या प्रसाराला तबलिकी जमातच्या कार्यक्रमाला दोषी धरण्यात येत आहे. ते दोषी आहेतच; पण त्यांना कार्यक्रम घेण्यास परवानगी का दिली? तेथे परदेशी लोक आलेच कसे? त्यांचा व्हीसा बंद का केला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, तबलिकींबरोबरच केंद्र सरकारही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास जबाबदार आहे, असा आरोप श्री.वडेट्टीवार यांनी केला.
मुंबईतही तबलिकींचा कार्यक्रम होणार होता. परंतु राज्य सरकारने परवानगी नाकारली. केंद्र सरकारही अशी परवानगी नाकारु शकली असते, असे श्री.वडेट्टीवार म्हणाले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सुमितभाई उनाडकाट उपस्थित होते.
गडचिरोलीत २ हजार कुटुंबांना वाटप करणार जीवनावश्यक वस्तू गडचिरोली शहरातील गरीब, निराधार, विधवा, अपंग व्यक्तींना काँग्रेस कमिटीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा शुभारंभ आज श्री.वडेट्टीवार यांच्या हस्ते झाला.