धनोजे कुणबी समाज मंदिरची १ लाख ११ हजारांची मदत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी घेतला निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिला धनादेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धनोजे कुणबी समाज मंदिरची १ लाख ११ हजारांची मदत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी घेतला निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिला धनादेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 7 एप्रिल 2020-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वजण चिंतित आहेत. लॉकडाउनमुळे आर्थिक घडी विस्कळली आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत धनोजे कुणबी समाज मंदिरच्या वतीने १ लाख ११ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत करण्यात आली आहे. मंदिरच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ७) मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

देशासह संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. प्रत्येक देश या आजारापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे छोटे-मोठे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. कामगारांच्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खासगी क्षेत्रातील कर्मचारीसुद्धा अडचणीत सापडले आहेत. तर, दुसरीकडे या आजाराशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाकडून पैशाची जुळवाजुळव केली जात आहे.राज्य शासन आपल्यापरीने तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता समाजातील दानशूर व्यक्तींनी या आजाराशी दोन हात करण्यासाठी पुढे येत आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले होते. 

मुख्यमंत्री सहायता निधी, जिल्हास्तरावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मदतीसाठी बँकेत खाते उघडले आहेत. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी समोर येत आर्थिक मदत केली आहे. अशात धनोजे कुणबी समाज मंडळानेसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत एक लाख ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे सुपूर्द केले.

धनादेश देताना अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, सचिव अतुल देऊळकर, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, कोषाध्यक्ष अरुण मालेकर, सल्लागार विनायक धोटे, सतीश निब्रड यांच्यासह कार्यकारिणी पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.