जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर द्वारे : 19 एप्रिल 2020 #DIOCHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर द्वारे : 19 एप्रिल 2020 #DIOCHANDRAPUR

Share This
◾️कोरोना विरुद्धच्या लढ्यात 11 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
◾️तपासणी करणारे डॉक्टर ते साफसफाई करणारे कर्मचारी आपले 'रियल हिरो '
◾️जिल्हयात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
◾️स्वयंसेवी संस्थांचे 5 हजार कार्यकर्ते सक्रिय
◾️दानशूर संस्था, प्रतिष्ठाने मदतीला पुढे
◾️साडेतीन हजार पोलिस कर्मचारी तैनात
◾️अनेक वरिष्ठ अधिकारी 18 ते 20 तास कार्यरत
◾️शेकडो अनामिक हातांचेही पाठबळ


खबरकट्टा /चंद्रपूर,दि.19 एप्रिल: 

चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. मात्र ही परिस्थिती कायम राहावी, जिल्ह्यात  कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये, यासाठी डोळ्यात तेल घालून  विविध विभागाचे हजारो कर्मचारी काम करीत आहे.जीव धोक्यात घालून तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी, जागता पहारा देणारे पोलीस, महानगरपालिका, नगरपालिकेचे सफाई कामगार ते सीमावर्ती भागातील ग्रामपंचायतीच्या शिपायांपर्यंत सगळेच कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत खरे हिरो ठरले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात जवळपास 11 हजार कर्मचारी सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या विरुद्ध कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत या तिघांच्या नेतृत्वात 200 डॉक्टर आणि 300 आरोग्य कर्मचारी अग्रणी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष तपासणी करण्यापासून तर जिल्ह्याच्या टोकावरील गावांमध्ये आलेल्या नव्या रुग्णांची नोंद घेण्यापर्यंत आरोग्य विभाग आपली सेवा देत आहे. प्रत्येकाकडे कामांचे वाटप करण्यात आले असून समन्वयाची भूमिका जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले पार पाडत आहे.

महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन,  याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या राज्य शासनाच्या अनेक विभागाचे शेकडो कर्मचारी या युद्धात आपला जीव धोक्यात घालून लढत आहेत.

जिल्ह्यातील 595 ग्रामसेवक, 2 हजार 563 अंगणवाडी सेविका, 2 हजार 392 अंगणवाडी मदतनीस, 1 हजार 907 आशा वर्कर, 1 हजार 300 ग्राम कर्मचारी याकाळात देवदूत बनून रस्त्यांवर उतरले आहे.

महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, सर्व तहासिलदार यांच्यासह 1 हजार 206 अधिकारी व कर्मचारी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागातील 191 अधिकारी 3179  पोलीस कर्मचारी असे 3370 कर्मचारी रस्त्यावर झटत आहे.

या लढ्यातील महत्त्वाचा योद्धा म्हणजे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, परीचारीका, एएनएम,आशा व अंगणवाडी सेविका हे आहेत. ग्रामीण भागातील 6 हजार 435, शहरी भागात 431 तर महानगरपालिका अंतर्गत 304 म्हणजेच जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्य विभागाचे एकूण 7170 आरोग्य कर्मचारी काम करीत आहे.

या युद्धात स्वयंसेवी संस्थाचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थेचा व इतर मनुष्यबळ ग्रामीण भागात 2310, शहरी भागात 929, महानगरपालिका अंतर्गत 1870 असे एकूण 5 हजार 109 इतर मनुष्यबळ कार्यरत आहे.त्याचप्रमाणे,सोयी सुविधेसंदर्भात व आवश्यक असणारी माहिती आपल्यापर्यंत पोहचविणारे पत्रकार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार ,तसेच विद्युत कर्मचारी असे अनेक अनामिक योध्दे या कोरोना विरुध्दच्या लढ्यात सहभागी आहेत. हा आकडा एकत्रित केल्यास 15 हजारावर (आरोग्य विभाग -7170, महसूल विभाग - 1126, पोलीस विभाग-3370, स्वयंसेवी संस्था -5000)कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी कार्यरत आहेत.


कोरोना विरुद्धच्या युद्धात लढ्यात अहोरात्र झटणाऱ्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सैनिक, आरोग्य अधिकारी व कर्मचारी डॉक्टर, परीचारीका, एएनएम, आशा व अंगणवाडी सेविका यासोबतच यांच्या मदतीला काही तालुक्यांमध्ये शिक्षक, सुद्धा पुढे आले आहे. या योध्दयांप्रती कृतज्ञता म्हणून नागरिकांनी घरातच राहावे व या युद्धात घरातच राहून सहभाग द्यावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.