कोरोनाविरूध्द संघर्षासाठी पुढील 10 दिवस महत्वाचे : डॉ. कुणाल खेमनार #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोनाविरूध्द संघर्षासाठी पुढील 10 दिवस महत्वाचे : डॉ. कुणाल खेमनार #lockdown

Share This

सोशल डिस्टन्सिंग पाळा ;जिल्ह्याच्या सिमा कडेकोट बंद ठेवा
◾जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही
◾जीवनावश्यक वस्तू चढ्या दरात विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार
◾जिल्हा नियंत्रण कक्षाकडून साडेसात हजार नागरिकांना दूरध्वनी
◾आशा वर्कर व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घराघराची तपासणी
◾जिल्हा प्रशासनाचे दूरध्वनी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रतिसाद देण्याचे आवाहन
◾जिल्ह्यातील निवारा गृहामध्ये 5 हजार लोकांना आश्रय
◾भाजीपाला किराणा व मेडिकलमध्ये सामाजिक अंतर पाळा
◾वेकोलीच्या मदतीने माजरी परिसरात 40 कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य वाटप
◾चंद्रपूर महानगरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना घरपोच किराणा सेवा
◾शिवभोजन योजनेचा निराश्रित नागरिकांना आधार
◾जीवनावश्यक वस्तू विक्री आवश्यकतेनुसार पूर्णवेळ सुरू राहतील
◾रस्त्यावरील वर्दळ व दुचाकी वाहने कमी करण्याचे निर्देश


खबरकट्टा /चंद्रपूर, दि. 5 एप्रिल : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. शहर,गाव, तालुका यांच्या प्रत्येकाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. यातील सर्व यंत्रणेने अशा परिस्थितीत अतिशय गांभीर्याने आपापली जबाबदारी पार पाडावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. तरीही बाहेर पडला तर आपसात सामाजिक अंतर पाळावे. पुढील 10 दिवस आणखी थोडी झळ सोसावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
      
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील 45 कुटुंबांना 15 दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या 15 ही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा गृहात 5 हजारावर विविध राज्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिक मुक्कामी असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे.
     
दरम्यान,आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदेशात प्रवास करून आलेल्या फक्त 3 व्यक्तींना निगराणीत सध्या ठेवण्यात आले आहे.आतापर्यंत 14 दिवस होम कॉरेन्टाईनचा अवधी 201 नागरिकांनी पूर्ण केला आहे. 204 नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन येणाऱ्या नागरिकांची माहिती घेत आहे. गेल्या 17 फेब्रुवारी ते 21 मार्च पर्यंत ज्यांनी बाहेरगावी प्रवास केला अशा सर्वांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी देखील केली जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांमधून देखील 10 वेगळ्या फोन लाईन्स मार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संदर्भातील तपासणी साठी येणाऱ्या दूरध्वनीला व कर्मचाऱ्यांना योग्य प्रतिसाद द्यावा. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही चौकशी होत असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महानगरपालिका मार्फत निराश्रित, निराधार, बेघर व विमनस्क व्यक्तींना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तयार भोजनाचे वितरण होत आहे. यासोबतच महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांगांना त्यांच्या पैशाने घरपोच किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी एका टिमचे गठण केले आहे. त्यांच्यामार्फत घरपोच ही सेवा देण्यात येत आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना 1 महिन्याचे रेशन वाटप सुरू झाले आहे. आपल्या रेशन कार्डवर 2 व 3 रुपये दराने अन्य अन्नधान्य मिळत असताना प्रत्येक अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती मानसी 5 किलो तांदूळ मोफत वाटप देखील सुरू झाले आहे.

दरम्यान,पुढील 10 दिवस सुरू राहणाऱ्या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी आतापर्यंत पाळलेले शिस्त कायम ठेवावी.चंद्रपूर शहरांमध्ये सामाजिक अंतर पाळून नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रतिबंध करावा, जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी घरातील एकाच नागरिकाने आठवड्याभरातून एकदाच बाहेर पडून, हे साहित्य घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.रस्त्यावरील दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी देखील त्यांनी निर्देशित केले असून पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.