कोरोना विषाणू संसर्गाच्या लढाईमध्ये अंतिम टप्प्यात आपण आलो असून नागरिकांनी घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नये. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची असून त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन केल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिली.
घरातील सुदृढ असणाऱ्या एकाच व्यक्तीला पुढील आठवडाभर एकदाच बाहेर पडावे लागेल असे नियोजन करावे व सामाजिक अंतर राखावे. जिल्ह्यामध्ये कोणी येणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. चंद्रपूरमध्ये जे कुणी अडकून पडले असेल किंवा ज्यांना बाहेर जायचे असेल त्यांनीही पुढील १४ तारखेपर्यंत संयम पाळावा,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.