- जिल्ह्यात १० ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था
- दररोज एक हजार थाळ्यांचे नियोजन
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात केवळ 5 रुपयांत शिवभोजन
- गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार
खबरकट्टा / वर्धा (उमंग शुक्ला -जिल्हा प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे.
जिल्हयात दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 1 हजार शिवभोजन थाळी / पॅकेट्स चे वितरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आज दिनांक 7 एप्रिल पुलगाव येथे शिवभोजन केंद्राचे उदघाटन केले आहे.यावेळी देवळी तहसीलदार राजेश सरोदे , पुलंगाव शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर , रमेश सावरकर यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे.
यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी,असंघटित कामगार,स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून वर्धा जिल्हयाला 1 हजार थाळयांचा इष्टांक मिळाला आहे.