चंद्रपूर शहरातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत बंद : व्यापारी प्रतिनिधी मंडळांचे पूर्ण सहयोगाचे आश्वासन #MNCCHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर शहरातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत बंद : व्यापारी प्रतिनिधी मंडळांचे पूर्ण सहयोगाचे आश्वासन #MNCCHANDRAPUR

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर १८ मार्च -   


राज्य शासनाने करोना विषाणूचा ( कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असल्याने चंद्रपूर शहर मनपा क्षेत्रातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त संजय काकडे यांनी दिले आहेत. मनपा स्थायी सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्च रोजी चंद्रपूर क्षेत्रातील व्यापारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यापारी संघांनी सहमतीने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे व पूर्ण सहयोग करण्याचे मान्य केले.        
   
सध्या कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव सुरु आहे तो रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने जे आदेश काढलेले आहे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्याकडून जे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार औषधी, दूध, भाजीपाला,किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू वगळता शहरातील इतर सर्व वस्तू सेवांच्या बाजारपेठ बंद करण्याचे आदेश मनपातर्फे देण्यात आले होते.  चंद्रपूर शहरातील चित्रपटगृह, मॉल, नाट्यगृह, व्यायामशाळा, पानठेले, खर्रा विक्री केंद्र,  तरणतलाव, अंगणवाड्या मोठी मंगल कार्यालये, लग्नाचे हॉल, लॉन्स यांना यापूर्वीच मनपाद्वारे नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे.  
  
या अनुषंगाने आयुक्त यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींना आपली व्यापारी प्रतिष्ठाने ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आवाहन या बैठकीत केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्सशी संलग्नित ३१ विविध व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे मान्य केले तसेच इतर सर्व व्यापारी वर्गाच्या बैठकी घेऊन जनजागृती करण्याचे मान्य केले.    

 याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे, उपायुक्त श्री. विशाल वाघ, श्री. गजानन बोकडे, सहायक आयुक्त शीतल वाकडे,  सचिन पाटील, विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार तसेच मनपा आरोग्य विभागाचे संपूर्ण कर्मचारी उपास्थीत होते. तसेच  चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी तसेच चेंबर ऑफ कॉमर्सशी संलग्नित ३१ व्यापारी संघटना -    
व्यापारी मंडळ, ऑटोमोबाईल डीलर संघटना, हॉटेल - हलवाई असोसिएशन, महात्मा फुले ठोक भाजी संघ, गुड्स ट्रान्सपोर्ट संघटना, जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशन, सराफ असोसिएशन, बिछायत असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, पुस्तक विक्री असोसिएशन, रेस्टोरेंट व बार असोसिएशन, क्लाथ मर्चंट असोसिएशन, रेडिमेड होजियरी असोसिएशन, फर्निचर असोसिएशन, सायकल डीलर्स असोसिएशन, मिल्क डिस्ट्रिब्युटर्स, केमिस्ट अँड ड्रगिस्ट, एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स, व्यापारी महासंघ, पेट्रोल डीलर्स, सॉ मिल असोसिएशन,इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, हार्डवेअर मर्चंट असोसिएशन, मेटल मर्चंट अँड होम अप्लायन्सएस, फूट वेअर असोसिएशन, डिस्ट्रिक झेरॉक्स संघ, डिस्ट्रिक्ट इनकम टॅक्स बार असोसिएशन, कॉम्पुटर असोसिएशन, हार्डवेअर अँड अलाइड मटेरियल ट्रेड असोसिएशन, ग्लास अँड प्लायवुड ट्रेड असोसिएशन यांचे अध्यक्ष - सचिव उपस्थीत होते.


चंद्रपूर शहरात सध्या एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसला तरी या रोगाचा प्रसार होऊन नये तसेच लॉक डाउन करण्याची परिस्थिती उद्भवू नये या दृष्टीने दक्षता घेणे गरजेचे असल्याने बाजारपेठ बंद राहणे आवश्यक आहे. दुकाने उघडी राहिल्यास मग ती थोड्या वेळासाठी का होईना गर्दी जमण्याची शक्यता असते व गर्दीच्या ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. त्यामुळे व्यापारी वर्गाने यात पूर्ण सहयोग देऊन आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत - आयुक्त संजय काकडे.