31 मार्च 2020 : घरातच सुरक्षित रहा, कोणाचीच उपासमार होऊ देणार नाही : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही; प्रशासनाचा घेतला आढावा #DIOCHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

31 मार्च 2020 : घरातच सुरक्षित रहा, कोणाचीच उपासमार होऊ देणार नाही : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही; प्रशासनाचा घेतला आढावा #DIOCHANDRAPUR

Share This

जिल्ह्यात एकही पॉझिटिव रुग्ण नाही
◾आतापर्यंत विदेशातून आलेल्या 154 प्रवाशांची नोंद
◾५३ प्रवासी निगराणीत, १०० लोकांचे कॉरेन्टाईन पूर्ण
◾ ३० हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करणार
◾ सर्व कृषी केंद्र, खते यांची दुकाने उघडे राहतील
◾शिव भोजन यंत्रणा आणखी सक्षमतेने राबविण्याचे निर्देश
◾महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
◾वितरणासाठी शासकीय यंत्रणेचा सहभाग घ्यावा
◾सरपंच, पं.स. सदस्य जि.प. सदस्य यांनी प्रशासनासोबत काम करावे
◾ जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही
◾ जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची कसून तपासणी करा
◾ व्हाट्सअप वरील खोट्या संदेशापासून सावध रहा

खबरकट्टा /चंद्रपूर(जिल्हा माहिती विभाग ) दि.३१ मार्च : 


चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व स्वतःच्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
      
ना.विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या काटेकोर कामाचे कौतुक केले. मात्र एकीकडे लॉक डाऊन असताना कोणत्याच परिस्थितीत अन्नधान्याचा पुरवठा किंवा तयार अन्न पुरविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे उपासमार होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी 5 एप्रिल नंतर आपण स्वतः वैयक्तीकरित्या 30 हजार अन्नधान्याच्या किट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
      
शेतकरी, शेतमजूर, गरीब, निराश्रित, बेघर विमनस्क अशा सगळ्या लोकांच्या रोजच्या भोजनाबाबत अधिक काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. महानगरात काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात गावा गावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या परिसरात कोणी उपाशी तर राहणार नाही, यासाठी प्रशासनासोबत येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

       
अन्य राज्यातील अनेक मजूर, कामगार रोजंदारी कर्मचारी बांधकामावर असणारे मजूर, छोट्या-मोठ्या उद्योगात काम करणारे मजूर, यांच्याकडे रेशन कार्ड नाही. मात्र रेशन कार्ड नाही म्हणून त्यांची उपासमार होता कामा नये, आपल्या राज्यातील अनेक ठिकाणी मजूर अडकून आहे.त्या त्या ठिकाणचे राज्यशासन त्यांची व्यवस्था करत आहेत. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व अन्य मंत्र्यांची आपले बोलणे झाले आहे. अन्य राज्यातील मजूर, प्रवासी व अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची,विद्यार्थ्यांची कामगारांची, उपासमार होणार नाही. त्यांना योग्य मदत मिळेल, यासाठी यंत्रणेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
        
आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले प्रशिक्षण व घेत असलेली काळजी, तसेच आशा वर्कर पासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी या काळातील कर्तव्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढील अनेक दिवस हा लढा आपल्याला लढायचा असून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत आवश्यक असेल किती यंत्र खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची ही त्यांनी सांगितले.
       

जिल्ह्यात आतापर्यंत बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या 100 नागरिकांचे होमकॉरेन्टाईन पूर्ण झाले आहे. 53 नागरीक अद्याप निगराणीत आहे . आत्तापर्यंत पाठवलेल्या सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने सुरू केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या समन्वयात सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील भेट दिली जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या असून सर्व जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी नागरिकांची उत्तम व्यवस्था केली जात आहे.त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.
       
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने गेल्या काही दिवसात अतिशय संयमाने काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. आतापर्यंत 67 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला मज्जाव करणे, आवश्यक असून जनतेने या काळात गरज नसताना बाहेर पडूच नये, असे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले.