राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे धान्य वितरण -जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे धान्य वितरण -जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारनं आणखी महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सरकार सर्वसामान्यांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल निर्णय झाला असून मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 

देशातल्या ८० कोटी जनतेला स्वस्त दरानं अन्नधान्य पुरवलं जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. एका व्यक्तीमागे ७ किलो रेशन देण्यात येईल. गहू प्रतिकिलो २ रुपये दरानं, तर तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दरानं दिला जाणार आहे. पुढील ३ महिने या दरानं अन्न पुरवठा केला जाईल. नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जाईल. पुढील तीन महिन्यांचं अन्नधान्य आधीच दिलं जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली होती. 

या निर्णयआधारावर कोरोना (कोविड-19) विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा संचारबंदी लागू असून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आली आहे.त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना एप्रिल,मे व जून 2020 या तीन महिन्याचे एकत्रित धान्य वितरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य वितरण सुरू आहे.परंतु, या धान्य दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांनी गर्दी करू नये. यासाठी जिल्ह्यांमध्ये धान्य वाटप करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.अन्नधान्याची उचल करण्यासाठी अतिरिक्त वाहने यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतांना गर्दी होवू नये तसेच धान्य दुकानासमोर 1 मीटरचे अंतर राखुनच धान्य वितरण केल्या जात आहे तसेच धान्य घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना हॅन्ड वॉश तसेच सॅनीटायझर वापरूनच धान्य वितरण करण्यात येत आहे. अशी खबरदारी प्रशासनाअंतर्गत घेण्यात येत आहे.

शिधापत्रिकाधारकांना एप्रिलमध्येच तीन महिन्यांचे धान्य एकत्रित उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याची उचल करूण पावती अवश्य घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.