कोरोना आजारा संदर्भात काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे हॉटेल्स व रिसॉर्ट मालकांना आवाहन दुबईवरून आलेल्या दोन रुग्णांची चंद्रपुरात नोंद #coronavirus - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना आजारा संदर्भात काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे हॉटेल्स व रिसॉर्ट मालकांना आवाहन दुबईवरून आलेल्या दोन रुग्णांची चंद्रपुरात नोंद #coronavirus

Share This
चंद्रपूर दि १३ मार्च : कोरोना आजारा संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज हॉटेल्स व रिसॉर्ट मालकांची बैठक घेऊन विदेशी पर्यटक, विदेशातून आलेल्या नागरिकांची नोंद करून प्रशासनाला कळविण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आज दुबईवरून आलेल्या दोन रुग्णांची नोंद करण्यात आली. रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

        
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहे. काल येथील  अनेक  वर्षांपासून सुरू असलेल्या महांकाली यात्रेला  स्थगिती देण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला.या निर्णयाला  भक्तांच्या  आरोग्याची काळजी म्हणून  आयोजन व्यवस्थेत असणाऱ्या सर्वांनी पाठबळ दिले आहे. त्यानंतर ताडोबा येथे येणाऱ्या  देश-विदेशातील पर्यटकांच्या मार्फत  कोणत्याही प्रकारे  कोरोना  विषाणूचे  संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी आज सर्व रिसॉर्ट व हॉटेल्स मालकांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली. त्या बैठकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची माहिती प्रशासनाला देण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. 


विशेषत: परदेशातून आलेल्या व विदेशी पर्यटकांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सामान्य नागरिकांना एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून खोकल्यावर अथवा शिंकल्यावर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, तयार करताना आणि केल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर, प्राण्यांचा सांभाळ केल्यानंतर आणि प्राण्यांची विस्तार काढल्यानंतर आपले हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
       
जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर मध्ये दुबईवरून आलेल्या दोन संशयित कोरोनाग्रस्त दांपत्याची माहिती आज प्रशासनाला मिळाली त्यानंतर या संदर्भात विशेष काळजी घेत या दोन्ही ही रुग्णांना योग्य ती वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत व पुरविली जात असल्याबाबत प्रशासनाने खात्री केली हे दोन्ही रुग्ण धोक्याबाहेर असून त्यांना केवळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
     
दरम्यान,राज्य शासनाने काल जाहीर केलेल्या सात देशांमधून किंवा अन्य ठिकाणावरून विमान प्रवास करून आलेल्या प्रवाशांमध्ये खोकला, ताप,श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे, अशी लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयाची संपर्क साधण्याचे आवाहन निवृत्ती राठोड यांनी केले आहे.
  
स्वतः कोणतेही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. शिंकताना खोकताना,रुमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा व आवश्यकता असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उघडण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक ०७१७२-२६१२२६, टोल फ्री क्रमांक १०४ , ०२० -२६१२७३९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.