दिनविशेष : "ऐतिहासिक माणगाव परिषदेला आज शंभर वर्षे पूर्ण...!!" #Babasaheb Ambedkar #rajshri shahu maharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दिनविशेष : "ऐतिहासिक माणगाव परिषदेला आज शंभर वर्षे पूर्ण...!!" #Babasaheb Ambedkar #rajshri shahu maharaj

Share This
खबरकट्टा / दिनविशेष :( संदर्भ:-राजश्री शाहू गौरव ग्रंथ)


देशाच्या एकुणच जडणघडणीवर नजर टाकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला टाळून पूढे जाणे अशक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजाला मिळालेले एक नक्षत्रांचे देणे आहे. जगभ्रमंती, वाचन आणि व्यासंग यांचा प्रचंड मोठा आवाका, समाजव्यवस्थेची पक्की जाण आणि त्यातील बदलांचे पक्के आणि निर्णायक उपाय या सर्वांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
          
आज केवळ भारत नव्हे तर, जगभरात या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञानभांडाराचा आधार घेतला जातो. पण, कोणताही महामानव एका रात्रीत जन्माला येत नाही. त्याच्या कार्याला पाठींबा देणारे अनेक हात त्याच्यासोबत असावे लागतात. असे हात जेव्हा असा मानवास मिळतात तेव्हा, समाजात अद्भूत परिवर्तन घडते जे पूढच्या समाजाचे भविष्य असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेटही समाजाचे भविष्य ठरवणारीच.
                
डॉ.आंबेडकर नामक व्यक्तीने उच्च पदवी प्राप्त केली हि बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेव्हा त्यांनी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत असलेल्या परळ येथील चाळीत आपला प्रतिनीधी पाठवून आंबेडकरांना कोल्हापूरला यायचे निमंत्रण दिले.
         
दरम्यान, महाराजांचे निमंत्रण स्विकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला आले. तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली. याच भव्य कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूरी मानाचा "जरीपटका" बांधण्यात आला.
            
डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची भेट समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि समाजकार्याची व्याप्ती वाढवणारी ठरली. या भेटीने दोघांच्या मनात विशेष जिव्हाळा निर्माण झाला. दोघांच्या जीवनाचे उद्दीष्ट एकच होते, ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विकास.
         
१९२० मध्ये कोल्हापूरातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. विशेष म्हणजे या अधिवेशनाला प्रामुख्याने शाहू महाराज उपस्थिती होती.


        
माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणतात की, *"तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिनंदन माझी खात्री आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील..!"


           
शाहूमहाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचा मार्ग सुकर झाला. तसेच, या दोन्ही महामानवातील ऋणानुबंध जास्त घट्ट होत गेला. पूढे डॉ. आंबेडकर संपूर्ण हिंदूस्थानचे नेते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, आज दिसणाऱ्या बहुजन कुळांचा उद्धार सोडाच पण, त्यांच्या आयुष्यातील अंधार अधिकच गडद झाला असता.
         
ज्या वेळी बाबासाहेब सामाजिक चळवळीत जास्त सक्रिय नव्हते त्यावेळी शाहू महाराजांनी बाबासाहेब यांच्यातील सक्षम नेतृत्वाचा अचूक वेध घेऊन भारतीय संविधानाचा शिल्पकार या भारत देशाला दिला होता. 
        
या परिषदेच्या अध्यक्ष पदावरून शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "शाहू महाराजांनी जयंती सणासारखी धुमधडाक्यात साजरी करा..!" हि असते सामाजिक कार्याची पावती..हि असते निस्वार्थी मनाने केलेली मदतीची दखल...हे असते महापुरुषांचे कार्य.


        
नाहीतर सध्या चार केळे रुग्णास देतांना सेल्फी काढली जाते आणि खाली लिहलेलं असते अमुक-अमुक संघटनेकडून सामाजिक भावनेतून रुग्णांना फळवाटप...स्वतःला समाजसुधारक समजून स्वतःच्या कार्याची प्रशंसा स्वतःच करतात....पण महापुरुषांच्या बाबतीत उलटे होते. महापुरुष कधी स्वतःच्या कार्याचा बोलबाला करत नाही....म्हणून महापुरुष हजारो वर्षे आपल्या कार्याने जिवंत राहतात.


        
दोन्ही महापुरुषांनी एकमेकांच्या कार्याची दखल घेतली. दोघेही सामाजिक सुधारणेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले होते.विशेष म्हणजे शाहू महाराजांच्या अकाली निधनानंतर सामाजिक सुधारणेची चळवळ डॉ.बाबासाहेबांनी जिवंत ठेवली.
     

सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर.